ताम्हिणी घाट अखेर वाहतुकीसाठी खुला, वेगमर्यादा ताशी 20 किमी अवजड वाहतुकीला मात्र नो एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे, रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेला ताम्हिणी घाट अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने सध्या केवळ दुचाकी व कारसह अन्य हलक्या वाहनांना येथून ये जा करता येणार असून अवजड वाहतुकीला मात्र नो एण्ट्री करण्यात आली आहे. दरम्यान, हलक्या वाहनांना ताम्हिणी घाटात ताशी २० किमी वेगमर्यादेचे बंधन घालण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या हद्दीत ताम्हिणी घाटाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने ताम्हिणी घाटात पुणे जिल्ह्याच्या हद्दीत काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. एका ठिकाणी छोटा साकवदेखील वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता दुरूस्तीची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे हलक्या वाहनांना तसेच एसटी बसेसना ये जा करण्यास पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. असे असले तरी वाहनांना प्रतितास २० किमीची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

पर्यटनावर परिणाम

ताम्हिणी घाट आणि येथील सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र यावर्षी प्रशासनाने हा मार्गच बंद केल्याने पर्यटनावर आधारित छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फटका बसला. आता उशिरा का होईना हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला केल्याने काही प्रमाणात का होईना स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

सूचना फलक…

पोलीसही तैनात राहणार वाहतुकीसाठी रस्ता खुला करताना जिल्हा प्रशासनाने काही निर्देश दिले आहेत. यामध्ये अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर विशेषकरून रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वाहनचालकांसह हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.