
समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासोबत शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी ‘प्रवाह फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेचा भव्य शुभारंभ बुधवारी दिमाखात पार पडला. वरळी येथील एनएससीआय (NSCI) येथे आयोजित या सोहळ्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना उपनेते-आमदार मनोज जामसुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनम व मितेश जामसुतकर यांनी ‘प्रवाह फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. या सोहळ्यावेळी जामसुतकर कुटुंबाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, “जामसुतकर कुटुंब गेल्या तीन दशकांपासून मतदारसंघासह विविध ठिकाणी जनतेची सेवा करत आहे. आता मितेश आणि सोनम यांनी देखील समाजकार्यासाठी पुढाकार घेत ‘प्रवाह फाऊंडेशन’ सुरू केले आहे. अनेकजण राजकारण किंवा समाजकार्याच्या माध्यमातून लोकांची मदत करतात. मात्र हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षात उतरवण्याचे काम या फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे.”
या सोहळ्याला शिवसेना आमदार सुनील शिंदे, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, नगरसेवक अंकित प्रभू, सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, किरण तावडे, नगरसेविका श्रद्धा जाधव, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, अखिल चित्रे, मितीषा जामसुतकर यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.






























































