शिवसेनेचा दणका; महापौरांच्या ‘सोशल’ प्रसिद्धीला ‘ब्रेक’! स्थायी समितीत सत्ताधारी भाजपवर प्रस्ताव रोखण्याची नामुष्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीवर २५ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने जोरदार विरोध केल्यानंतर आज स्थायी समितीत रोखण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर आली. बुधवारी या प्रस्तावावर शिवसेनेने आक्षेप घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांत प्रचंड चर्चा झाली. यामुळे बुधवारी दुपारी २ वाजता होणारी स्थायी समितीची सभा अचानक रद्द करण्यात आली होती. तर आज हा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने चर्चेला न घेता थेट ‘नोटेड’ (Noted) करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

महापौर रितू तावडे यांची सोशल मीडियावर प्रसिद्धी करण्यासाठी पालिकेकडून तब्बल २५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी ‘मे. रनटाइम सोल्यूशन्स प्रा. लि.’ या कंपनीला कंत्राट देण्याबाबत स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्याचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले होते. मात्र, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी याला जोरदार विरोध केला आणि “महापौरांना सोशल मीडियावर प्रसिद्धीची गरजच काय?” असा सवाल उपस्थित करत प्रस्तावाला विरोध दर्शवला.

आणखी एका पत्राने पुन्हा वाद

महापौरांच्या वाहनावरील दिवे, बंगल्याची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, उपमहापौरांना दिली जाणारी सावत्र वागणूक आणि सोशल मीडियावरील खर्च इत्यादी विषयांवरून महापौर रितू तावडे यांच्याबाबत वाद निर्माण झाला होता. असे असतानाच, आता ‘महेश ट्युटोरियल्स’चे संचालक डॉ. श्रेणिक कोटेचा यांची पालिकेच्या शाळांमधील नव्या शैक्षणिक उपक्रमांसाठी मानद सल्लागार म्हणून नियुक्ती करा, असे पत्र शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना लिहिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मात्र, “असे कोणतेही पत्र मी दिलेले नसून ते पत्र बनावट आहे,” असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आणि या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले.