
१६२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर वकील संघटनेच्या अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे. वकील संघटनेचे हे सर्वोच्च पद महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय ‘ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ने (AAWI) घेतला आहे. त्यासाठी संघटनेच्या घटनेत व नियमांत आवश्यक दुरुस्ती करण्यात आली आहे.
संघटनेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी घटनेत कशा प्रकारे दुरुस्ती केली जावी, याचा विचार करण्यासाठी AAWI ने ठराव मंजूर करून एका समितीची स्थापना केली होती. या समितीने अध्यक्षपद महिलांसाठी राखून ठेवण्याची शिफारस केली; त्यानुसार संघटनेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आगामी निवडणुकीपासूनच होणार असून, लवकरच संघटनेची सूत्रे एका महिला अध्यक्षांच्या हाती सोपवली जातील.
“१६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेकडे अध्यक्षपद येणे ही अत्यंत क्रांतिकारी आणि समानता प्रस्थापित करणारी घटना आहे. एकूण सदस्यसंख्येतील महिलांचे प्रमाण पाहता, हे समानतेच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. महिलांसाठी हा निश्चितच एक मैलाचा दगड ठरेल.”
— ज्येष्ठ वकील दीपा चव्हाण






























































