दादर, माहीम, धारावीतील स्वच्छतेसाठी नव्या गाड्या; राज ठाकरे यांच्या हस्ते नव्या वाहनांचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘जी-उत्तर’ विभागाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांपैकी २० गाड्यांचे लोकार्पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथे करण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त मुंबईच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या प्रयत्नांतून ‘जी-उत्तर’ विभागाच्या घनकचरा ताफ्यात लहान-मोठ्या मिळून एकूण ७३ कचरा संकलन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील २० वाहनांचे लोकार्पण राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. “मुंबईला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पालिकेच्या प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी मिळून या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी द्यावी,” असे आवाहन या वेळी यशवंत किल्लेदार यांनी केले. या नव्या वाहनांमुळे कचरा संकलनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत होणार असून, कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.