ठाण्यात शिंदे गटाला धक्का; सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवकपद संपुष्टात आल्याचे आदेश ठाणे पालिका प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे ठाण्यातील शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुलेखा चव्हाण या प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासंदर्भातील तपासणी समितीच्या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर समितीच्या १६ जून रोजीच्या आदेशाच्या आधारे महापालिका प्रशासनाने संबंधित पद रिक्त झाल्याची कार्यवाही केली आहे. नगरसेवकपद रद्द झाल्याने पुढील निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सुलेखा चव्हाण या बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या जागेवरील पुढील प्रक्रियेलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिंदे गटाच्या नऊ नगरसेवकांवर टांगती तलवार

नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द झाले असले, तरी शिंदे गटाच्या आणखी नऊ नगरसेवकांवर नगरसेवकपद रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणी विरोधकांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली असून, यावर निवडणूक विभाग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.