
सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्यामुळे मुंबईतील बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने अक्षरशः फुलून गेल्या आहेत. लाडू, मोदक आणि तयार प्रसादासह सुगंधी अगरबत्त्या, धूप-कापराचा मनमोहक सुगंध चहुबाजूंनी दरवळत आहे. मोठ्या मंडळांच्या मूर्ती आधीच मंडपात डेरेदाखल झाल्या असून घरगुती बाप्पाच्या आगमनाआधी घरांची साफसफाई-रंगरंगोटी आणि आकर्षक डेकोरेशन करण्यात भाविक रंगून गेले आहेत. मुंबई गणराज रंगी रंगली असून चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारा गणेशोत्सव सोमवार, १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह गृहनिर्माण सोसायट्या व सामाजिक संघटनांनी गणेशोत्सवासाठी अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामध्ये पारंपरिक संगीत, भजन, कीर्तन, भारूड, मनोरंजनाचे कार्यक्रम यांसह सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी भाविकांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील अनेक कोकणवासीयांनी मूळ गावी जाण्याची तयारीही केली आहे.
होऊ दे खर्च!
या वर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावरच नारळापासून दूध, कडधान्ये, गॅस, प्रवासखर्चापासून मूर्ती आणि सजावटीचे साहित्य महागले असले तरी गणेशभक्तांना याची कसलीही पर्वा नसल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. बाप्पासाठी वाट्टेल ते करून खरेदी करणारच असा निश्चय करून भाविकांची गणेशोत्सव खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडत आहे.
देखाव्यांचे आकर्षण, सामाजिक बांधिलकी
या वर्षीदेखील बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक देखाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, ऐतिहासिक वारसा-घटना, धार्मिक परंपरा, महिला संरक्षण आणि शैक्षणिक जागृतीचे देखावे व डेकोरेशन मंडळे आणि घरोघरी करण्यात आले आहे.
























































