
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेली आहे. दरवाढीपूर्वी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 98 डॉलर होती. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत 2.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे. अमेरिकन सैन्याने मंगळवारी रात्री उशिरा इराणची पाच तेलवाहू जहाजे नष्ट केली आहेत. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचा दावा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने निवेदनाद्वारे केला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित नाही
कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे. जगातील 20 टक्के पेट्रोलियम या मार्गातून जाते. सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतसह स्वतः इराण हा देशही निर्यातीसाठी याच मार्गावर अवलंबून आहे. भारतदेखील 50 टक्के कच्चे तेल आणि 54 टक्के एलएनजी (LNG) या मार्गाद्वारे आयात करतो. मात्र इराण युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नसून, संभाव्य धोक्यामुळे एकही तेलवाहू जहाज या मार्गावरून जात नाही.
























































