फाइव्ह स्टार हॉटेलांना पार्व्हिंगमध्ये 50 टक्के सूट नाहीच! सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळ परिसरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील फाइव्ह स्टार हॉटेलांना आवश्यक पार्किंगमध्ये 50 टक्के सूट देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. तसेच वर्सोव्यात अग्निशमन केंद्राची गरज नसल्याचे सांगत आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावालाही विरोध करण्यात आला.

पालिकेच्या नियमांनुसार हॉटेलच्या एकूण बांधकाम क्षेत्रानुसार पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र हॉटेलच्या एकूण क्षेत्रात लॉबी, कॉरिडॉर, स्वयंपाकघर, स्टोरेज आदी भागांचाही समावेश होतो. या ठिकाणी वाहनांची ये-जा होत नसल्याने पार्किंगच्या जागेत 50 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता. प्रस्तावावरील चर्चेदरम्यान शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, काँग्रेसचे अश्रफ आझमी आदींनी पार्किंगच्या नियमांमध्ये एवढी मोठी सूट देण्यामागचे कारण विचारले. अखेर सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी यांनी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

वर्सोव्यात अग्निशमन केंद्राची गरज नसल्याच्या निर्णयाला विरोध

वर्सोव्यातील म्हाडाच्या एका भूखंडावर अग्निशमन केंद्रासाठी आरक्षण होते, मात्र या ठिकाणी अग्निशमन केंद्राची गरज नसल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर हे आरक्षण रद्द करून बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र अशा पद्धतीने डीपी बदलायचा अधिकार अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कोणी दिला? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. याशिवाय या ठिकाणी महापालिकेच्या चौकीचीही गरज नसल्याचे सांगत भूखंडाचे आरक्षण गृहनिर्माणासाठी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. अखेर सुधार समितीने अग्निशमन विभाग आणि महापालिका प्रशासनाचा हा प्रस्तावही फेटाळून लावला.