वाकोल्यात ‘प्रेम नगर’ मंदिराचा साज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाकोला, यशवंत नगर येथील शिवसेना शाखा क्रमांक ९१ च्या माध्यमातून ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने’ यंदा ‘प्रेम नगर’ मंदिराची हुबेहूब भव्य प्रतिकृती साकारली आहे. परिसरातील शिस्तबद्ध मंडळ म्हणून ओळख असलेल्या या मंडळाचे यंदा ४२ वे वर्ष असून, यापूर्वीही मंडळाने विविध प्रसिद्ध मंदिरांचे देखावे उभारले आहेत. या देखाव्यांना मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या प्रथम पारितोषिकांसह कला, मूर्ती व सजावटीसाठीच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची यंदा सहा फुटांची, पाषाणावर (दगडावर) विराजमान झालेली आकर्षक गणेशमूर्ती मंडपात स्थानापन्न होणार आहे. या मूर्तीसाठी मंडळाने २५x७ फूट जागेत ‘प्रेम नगर’ मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिराची उंची ३५ फूट असून, मरून आणि सोनेरी रंगाच्या आकर्षक संगमाने ते सजवले आहे. भाविकांच्या स्वागतासाठी ५५x२० फुटांचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसरात ५०० मीटरपर्यंत सुंदर विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

हे मंदिर बंदिस्त नसून खुल्या स्वरूपाचे आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्यांना सहज दर्शन घेता यावे, यासाठी या मंदिराची अशी रचना करण्यात आल्याची माहिती मंडळाचे संस्थापक व शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी दिली. आमदार संजय पोतनीस हे मंडळाच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत असून गोविंद गायकर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.