
गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असून बाप्पाच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांनी मुंबईतील बाजारपेठा फुलल्या आहेत. झेंडू, जास्वंद, मोगरा, शेवंती, गुलाब यांसह विविध फुलांची आवक वाढली असली, तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरांनी मात्र चांगलीच उसळी घेतली आहे. आठवडाभरापूर्वी २० ते ३० रुपये किलो मिळणारा झेंडू आता थेट १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. बाप्पाला प्रिय असलेल्या जास्वंदीच्या एका फुलासाठी भक्तांना तब्बल १० रुपये मोजावे लागत आहेत.
दादर, प्रभादेवी, बोरिवलीसह मुंबईतील विविध फुलबाजारांमध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी फुले आणि हार खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. सातारा, पुणे, सांगली आणि कोल्हापूर या भागांतून झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने झेंडूच्या दराने शंभरी पार केली आहे.
शेवंतीचा दर १०० रुपये किलो, गुलाब २५० रुपये किलो, अस्टर २०० रुपये किलो, तर तेरड्याची फुले १०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर फुलांचे दर दुप्पट ते तिप्पट वाढल्याने भक्तांच्या खिशाला झळ बसणार आहे.























































