घरातील एक कोटीहून अधिकची रोकड चोरी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. यामुळे शेतकऱ्याने तातडीने पोलिसात धाव घेतली आणि पोलीस तपासात त्याची रक्कम त्याला परत मिळाली. या तपासात पोलिसांच्या 4 श्वानाने मोठी भूमिका बजावली.
गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका तालुक्यातील सरगवाडा गावात राहणारे 53 वर्षीय शेतकरी उदेसंग सोलंकी यांनी 13 ऑक्टोबर रोजी कोठ पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली होती. उदेसंग सोलंकी यांनी 12 एकर जमीन विकली असून त्या जमीन खरेदीदारांनी उदेसंग यांना 10 ऑक्टोबर रोजी आगाऊ रक्कम एक कोटी 7 लाख 80 हजार रुपये दिले होते. त्यांनी ते पैसे गव्हाच्या ड्रममध्ये ठेवले होते. पण ते पैसे कोणीतरी चोरले.
शेतकऱ्याच्या घरातील गव्हाच्या ड्रममध्ये ठेवलेले एक कोटी 7 लाख 80 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. दोन्ही चोरटे सरगवाडा गावचे रहिवासी होते. दोन्ही चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांच्या श्वानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांनी तक्रारदाराने केलेल्या कॉल्स डिटेल्स आणि पैसे देवाण-घेवाणीबद्दल बोलल्यावर या घटने संबंधीत 40 आरोपींची चौकशी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक ओमप्रकाश जाट यांनी सांगितले की, ज्या घरातून चोरी झाली त्या घरातून एक बॅग सापडली. मात्र 4 वर्षांच्या श्वानाच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपींच्या घरापासून 50 मीटर अंतरावर श्वान पोलिसांपर्यंत पोहोचला. तेथून आरोपींना पकडून चौकशी करण्यात आली. उदेसंग यांचे मित्र बुधच्या घरातून 53,90,000 रुपये जप्त करण्यात आले. त्याचवेळी चौकशीदरम्यान दुसरा चोर विक्रम याच्या घरातूनही उर्वरित रक्कम जप्त करण्यात आली. मुख्य आरोपी बुध याने आधीच उदेसंगच्या घरातून 1,07,80,000 रुपयांची चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. जेणेकरुन त्याबाबत कोणालाच शंका येणार नाही. संपूर्ण तपासादरम्यान बुध आम्हाला सहकार्य आणि मदत करत होता, परंतु तो मुख्य चोर असल्याचे निष्पन्न झाले.