
रशियामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. पश्चिम रशियातील ब्रांस्क प्रांतातील एक पूल कोसळल्यामुळे प्रवाशांनी भरलेली रेल्वे रुळावरून घसरली. यात 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मॉस्को रेल्वेने एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे.
मॉस्को रेल्वेने दिलेल्या निवेदनानुसार, सदर रेल्वे रशियातील पश्चिमकडे असणाऱ्या क्लिमोव येथे मार्गस्थ झाली होती. मात्र ब्रांस्क प्रांतातील विगोनिचस्की जिल्ह्यात रेल्वे रुळावरून घसरली. पूल कोसळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भरधाव रेल्वे कोसळल्याला पुलाच्या ढिगाऱ्याला धडकली आणि रुळावरून घसरली.
ब्रांस्कचे गव्हर्नस अलेक्झेंडर बोगोमाज यांनीही या रेल्वे दुर्घटनेचा दुजोरा दिला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे म्हटले. रशियाची वृत्तसंस्था आरआयए आणि टीएएसएसने दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रेल्वेच्या मोटरमनचाही समावेश आहे.
As a result of poorly maintained infrastructure.
A bridge collapsed in the Bryansk region while a train was moving.
Four Russians were killed, more than 20 were injured. pic.twitter.com/MlXhz5YljQ
— Charlie (@Acuteremod) June 1, 2025
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान ब्रांस्क प्रांतावरही ड्रोन हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे पूल उडवून हा रेल्वे अपघात घडवून आणल्याची शक्यता टेलिग्राम चॅनल बाजा आणि शॉटने केला आहे. मात्र यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, अपघातानंतर ब्रांस्क प्रशासनाने बचावकार्य सुरू केले असून आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.