मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अभियंत्याला अटक

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेप्रकरणी दोन कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतक इंटरप्राईजेस आणि एपको इन्फ्रास्ट्रक्चरवर कारवाई करण्यात आली आहे. तर प्रकल्प समन्वयक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. सुजित सदानंद कावळे असे अटक अभियंत्याचे नाव आहे. रायगडमधील माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा केला. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते बहाने दरम्यान 26.7 किमी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम डिसेंबर 2017 पासून सुरू होते. चेतक इंटरप्राईजेस आणि एपको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांकडे महामार्गाचे कंत्राट होते. सदर काम दोन वर्षांच्या आत पूर्ण करायचे होते. मात्र कालावधी उलटूनही हे काम पूर्ण झाले नाही. यानंतर कंत्राटदार कंपनीला मुदतवाढ देण्यात आली. तरीही काम वेळेत पूर्ण झाले नाही. याबाबत महामार्ग प्राधिकरणाकडून कंत्राटदार कंपन्यांना अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती.

महामार्ग कामकाजाच्या गुणवत्तेतही सुधारणा केली नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा काही भाग खोदून पुढील काम अपूर्णच ठेवले आहे. यामुळे महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडत आहेत.

2020 पासून या मार्गावर आतापर्यंत 170 वाहनांचा अपघात झाला असून यात 97 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर 208 प्रवाशांना गंभीर आणि किरकोळ जखमा झाल्या. या अपघात प्रकरणी कारणीभूत असलेल्या कंत्राटदार आणि अभियंत्याविरोधात प्रकल्प अभियंता आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहीता कलम 105,125 (अ) (ब) व 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.