माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सराईत गुन्हेगाराचा हॉटेलमध्ये गोळीबार, माथाडीच्या वादातून सराईताकडूनच मॉलसमोर गोळीबार, या गोळीबाराच्या घटना शहरात घडल्या. पोलिसांनीही मध्य प्रदेशातून शहरात होणारी अवैध पिस्तुलांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. दहशतीसाठी पिस्तूल, कोयते, तलवार बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चालू वर्षातील आठ महिन्यांत बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 107 गुन्हे दाखल केले असून, तब्बल 147 पिस्तुले जप्त केली आहेत. तर, 167 जणांना गजाआड केले आहे. यावरून शहरात गुन्हेगारीची मानसिकता बळावून शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड तर तयार होत नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन सहा वर्षे उलटली. परंतु, दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. काळेवाडीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला. पोलिसांनी केवळ चौकशी करून नगरसेवकाला सोडले आणि सराईतालाही तत्काळ जामीन मिळाला. माथाडीचे काम मिळण्याच्या वादातून आणि दहशत माजविण्यासाठी सराईत गुन्हेगाराने वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार केला. काळेवाडी, बावधन, खेड, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी अशा खुनाच्या पाच घटना घडल्या. पिंपळेगुरव व नवी सांगवीत दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी 14 वाहनांची तोडफोड केली.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट तीन, चार आणि मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मागील आठवड्यात हिंजवडी, वाकड, आळंदी आणि चाकण परिसरात वेगवेगळ्या कारवाया करत आठ पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली. या पाच कारवायांमध्ये नऊजणांना अटकही करण्यात आली. गुन्हे शाखेच्या विविध युनिटकडून वेळोवेळी कारवाई करून शस्त्रे जप्त केली जातात. पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याचे समोर येते. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना एक- दोन वर्षांसाठी हद्दीतून तडीपार केले जाते. मात्र, ही कारवाई ‘कागदावर’च राहत असून, तडीपारांचा शहरात वावर असल्याचे दिसून येते. अनेक कारवायांमध्ये तडीपार गुन्हेगारांकडे बेकायदा पिस्तुले, कोयते अशी हत्यारे आढळून आली आहेत.