>> सूर्यकांत पाठक
हिंदुस्थानात आकारास आलेल्या मॉलने ग्राहकाच्या जीवनशैलीत कायापालट केला असून ही बाब खरी आहे. त्याच वेळी किरकोळ बाजारातील व्यावसायिकांना एकवटण्याचे आणि अधिक संघटित होण्यास मदत मिळाली आहे, परंतु अधिक खर्चिक राहणे ही बाब भविष्यासाठी असुरक्षित राहू शकते.
लोकसंख्येतील वाढ, अपेक्षांमधील बदल आणि तंत्रज्ञानातील विकासाचा वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर आणि विक्रीच्या शैलीवर परिणाम झाल्याचं दिसून येतं. या संक्रमणात ग्राहकाविषयी व्यक्त होणारा भावनिक ओलावा क्रमश कमी कमी झाल्याचं दिसून येत असलं तरी सेवासुविधांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे हे मान्य करावं लागेल. पूर्वीच्या काळी गल्लीतल्या किराणा दुकानदाराला आपल्या सर्व ग्राहकांची नावं तोंडपाठ असायची. दुकानात गेलं की, घरगुती भाषेत ग्राहकाचं स्वागत होत असे. वर्तमानपत्राच्या त्रिकोणी घडीत डाळ, साखर घेऊन पुडय़ाच्या दोऱयानं बांधता बांधता घरातल्या वयोवृद्ध, आजारी व्यक्तींच्या तब्येतीची विचारपूस दुकानदाराकडून आस्थेनं केली जायची. मुलांना किती मार्क पडले, हेही तो विचारायचा. नोकरदारांना महिन्यातून एकदाच उत्पन्न मिळतं. मात्र आपल्या दुकानाची पायरी त्याला जवळ जवळ रोज चढावी लागते हे माहीत असल्यामुळं नियमित ग्राहकांची ‘खाती’ दुकानदाराकडे असायची. मालाची यादी घेऊन लहान मुलांना दुकानात पाठवलं जायचं. क्वचित प्रसंगी दुकानातल्या पोऱयाकरवी घरपोच सेवाही द्यायचा. फिरते विक्रेते, हंगामी विक्रेते त्या काळी अधिक असायचे. भाजीपासून कोकणच्या मेव्यापर्यंत, आईक्रीम-कुल्फीपासून अगरबत्त्यांपर्यंत अनेक वस्तू घरपोच येत असत. तिथपासून ते मॉल संस्कृतीपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपला बराच काळ गेला आहे.
एकेकाळी वेगवेगळ्या सामानासाठी वेगवेगळ्या दुकानावर जावे लागत असे. हळूहळू दुकानाची जागा सुपर बाजार किंवा सुपर मार्केटने घेतली आणि त्याचे स्वरूप एखाद्या जनरल स्टोअर्सप्रमाणे असायचे. हळूहळू हाच सुपर बाजार मॉलमध्ये परावर्तीत झाला. मॉल संस्कृती ही वास्तविक लोकांची मानसिकता लक्षात घेऊन अस्तित्वात आणली आहे. मॉल हे पूर्णपणे ग्राहकांना आकर्षित करण्याचे केंद्र बनले असून त्यानुसारच रचना करण्यात आली आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट आणि त्याकडे सहजासहजी कोणाचे लक्ष जात नाही आणि ती म्हणजे मॉलला जाण्यासाठी वेळेचे बंधन नसणे. जेणेकरून आपण जेव्हा मॉलमध्ये पाऊल टाकू तेव्हा आपल्याला वेळेचे भान राहणार नाही. जोपर्यंत आपला खिसा रिकामा होत नाही, तोपर्यत शॉपिंग करण्याची मानसिकता तयार करण्याचे काम मॉलच्या वातावरणाकडून केले जाते. कधीतरी अनुभव घ्या! आपल्याला शंभर रुपयांचे सामान घ्यायचे असेल तर आपण मॉलमध्ये हजार रुपये खर्च करून परततो. अशा वेळी आपण गरज नसलेल्या सामानाचीदेखील खरेदी करतो.
मॉल आपल्या खिशातून पैसे कसे काढतो आणि कशा रीतीने शंभर रुपयांच्या वस्तूला 200 रुपयांत विकत घेतो किंवा आपण एक पँट खरेदी करण्यासाठी जातो आणि घरी येताना तीन तीन पँट व शर्ट घेऊन येतो हे गणितदेखील समजून घेणे गरजेचे आहे. अशाच रीतीने आपण ‘फ्री’च्या जाळ्यात अडकतो. ग्राहकाला आपला खिसा रिकामा होत असल्याचे कळतही नाही. कोणताही ब्रँड हा मोफतमध्ये वस्तू देत नाही आणि फायदा झाल्याशिवाय त्याची भरभराट होत नाही. मॉलच्या या संस्कृतीने ब्रँडला फायदा होतोच, त्याचबरोबर त्याच्या विक्रीतही वाढ होते. कारण मॉलमध्ये एका शर्टच्या ठिकाणी दोन शर्ट विकले जातात. याप्रमाणे सामानाच्या विक्रीचेदेखील एक धोरण असते. त्यात अति महागाच्या वस्तू खरेदीसाठीची असणाऱया मानसिकतेचा लाभ उचलला जातो. त्यामुळे मॉल संस्कृती ही लोकांना खर्चिक करत आहे आणि ग्राहकही स्टेटसच्या नावावर डोळे बंद ठेवून पैसे खर्च करत राहतात. उरलीसुरली कसर क्रेडिट कार्डने भरून काढली आहे.
हिंदुस्थान आध्यात्मिक आणि घडामोडींनी व्यापलेली भूमी आहे. विकासासाठी सजग आहे. मॉल संस्कृती हे एक छोटे उदाहरण आहे. हे कमर्शियल भवन केवळ आंतरराष्ट्रीय ब्रँडसाठी युद्धाचे मैदान तयार करत नाही, तर लोकांना स्वयंप्रेरणेतून आणि मूल्य व्यवस्थेविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज करतो.
मॉल संस्कृतीने हिंदुस्थानी खरेदीच्या पद्धतीने क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे, असे आपण म्हणू शकतो. एखाद्या दुकानात उन्हाच्या तीव्र झळा सहन करत खरेदी करण्याऐवजी वातानुकूलित मॉलमध्ये खरेदीचा आनंद लुटला जात आहे. तरुण मंडळी याकडे प्रतिष्ठा म्हणून पाहत आहेत. मॉलमध्ये खरेदी केल्याने ग्राहकांची चांगले, गुणवत्तापूर्ण ब्रँडेड उत्पादन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होते आणि त्यामुळे आत्मिक समाधान लाभते. काही तरुण तर फुशारकी मारण्यासाठी मॉलमध्ये जातात, परंतु देशातील शॉपिंग मॉलने हिंदुस्थानात नवीन संस्कृतीला जन्म दिला आहे. ही संस्कृती आपल्या पारंपरिक खरेदी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. हिंदुस्थानात उत्पन्न वाढल्याने बाजारपेठ क्षेत्रात लोकांना काम करण्याची संधी नव्याने उपलब्ध होत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जीवनशैलीत सुधारणा आणि बदल झालेला आहे. मॉलमुळे हिंदुस्थानी ग्राहकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून गेली आहे. किरकोळ बाजार संघटित होण्यास मदत मिळत आहे, परंतु लोकांनी अवास्तव खर्च करणे हे भविष्यासाठी हानीकारक आहे आणि ही बाब कोणत्याही देशासाठी शुभ संकेत मानता येणार नाही.
(लेखक अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)