सिम कार्ड काढण्याची पिन श्वसननलिकेत अडकली; डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत महिलेला दिले जीवदान

रत्नागिरीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईलचं सिम कार्ड काढण्याच्या नादात तोंडात ठेवलेली पिन महिलेच्या श्वसननलिकेत जाऊन अडकली. महिलेला तात्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेच्या अन्ननलिकेत अडकलेली पिन बाहेर काढत त्या महिलेला जीवदान दिले आहे.

रत्नागिरी येथील 23 वर्षीय महिला मोबाईलचे सिम बदलत होती. यावेळी सिम कार्ड काढण्याची पिन तिने तोंडात ठेवली होती. चुकून ती पिन तिने गिळली. मात्र पिन गिळल्यानंतर तिला श्वसनास किंवा गिळण्यास काही त्रास होत नसल्याने ती डॉक्टरांकडे न जाता घरीच थांबली.

दुसऱ्या दिवशी रत्नागिरी येथील सर्जनकडे गेली आणि डॉक्टरांना पिनबाबत सांगितले. डॉक्टरांनी अन्ननलिकेची स्कोपी करुन पाहिले मात्र पिन दिसली नाही. त्यानंतर त्यांनी छातीचा एक्स रे आणि स्कॅन करुन पाहिले असता अन्ननलिकेच्या उजव्या बाजूला पिन अडकलेली आढळली. यानंतर डॉक्टरांनी महिलेला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

वालावलकर रुग्णालयातील ई. एन. टी सर्जन डॉ. राजीव केणी यांनी इमर्जन्सी ऑपरेशन करून पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाईकांनी महिलेला वालावलकर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ पूर्वतपासण्या आणि शस्त्रक्रियेची तयारी केली. डॉ. केणी यांनी रात्री 10 वाजता महिलेची ब्रोन्कोस्कोपी करून श्वासनलिकेतील पिन बाहेर काढली.

डॉ. लीना ठाकूर, डॉ. गौरव बाविस्कर आणि त्यांच्या टीमने अत्यंत कुशलतेने महिलेची शस्त्रक्रिया करुन महिलेला जीवदान दिले.