महेंद्र थोरवे भाजपच्या वाटेवर, शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुखांचा गौप्यस्फोट

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळेच ते उरण, पनवेल, कर्जत-खालापूर परिसरात भाजपचे आमदार महेश बालदी यांना छुप्या पद्धतीने मदत करून शिंदे गट रसातळाला घालवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केला. गद्दारी करणाऱ्या थोरवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी उरण, पनवेल, कर्जत-खालापूर मतदारसंघात शिंदे गट हद्दपार करण्याचा आमदार महेंद्र थोरवे यांनी जणू विडाच उचलला आहे. त्यासाठी महेश बालदी यांच्या सांगण्यावरून थोरवे यांनी प्रभारी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी उरण-पनवेल मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. मात्र उरण-पनवेल मधील शिवसेनेच्या सहा उमेदवारांनी नकार देऊन आदेश धुडकावून लावले आहेत. त्यांच्यावर कारवाईची भाषा करणाऱ्यांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणण्यासाठीच आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी दिली.

– उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी उमेदवारांना पक्ष कार्यालयातून देण्यात आलेले एबी फॉर्म आमदार थोरवे यांनी परस्पर गहाळ केले होते.

– थोरवे यांनी हा कारनामा केल्यानंतर ठाण्याच्या कार्यालयातून एबी फॉर्म आणून उमेदवारांना वाटप करण्यात आले असल्याचा गौप्यस्फोटही अतुल भगत यांनी यावेळी केला.

– मागील साडेतीन वर्षांपासूनच उरण, पनवेल, कर्जत-खालापूर मतदारसंघात आमदार थोरवे यांची भूमिका शिंदे गटाच्या विरुद्ध तर भाजपला सहकार्य करण्याचीच राहिली आहे. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

– फक्त महेश बालदी यांना सहकार्य करून आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे असेही यावेळी अतुल भगत यांनी स्पष्ट केले.

– खासदार बारणे यांनी उरण, पनवेल, कर्जत-खालापूर मतदारसंघातील पक्षाच्या कारभारात ढवळाढवळ करू नये अशी तंबी थोरवे यांना दिली आहे.