>> विश्वनाथ ससे
त्र्यंबक वसेकरांबाबतचे विविध कृतिशील पैलू उलगडावेत, वाचकास सुलभ वाटावेत म्हणून या ग्रंथाची एकूण 7 गटांत विभागणी केली गेली आहे. गोदातटीचे रंगऋषी, कला प्रवासातील मान-सन्मान, संबंधित वृत्तपत्र लेख, साहित्यातील चित्रकार, साहित्यिक, शासकीय कार्यालयीन पत्रव्यवहार, कलोपासक पुस्तकातील लेख, स्मृतितरंग या आत्मचरित्रातील प्रासंगिक अनुभव आदी पैलूंची भर खरेच लक्षवेधी ठरणारी आहे. या ग्रंथातील विभाग चारमध्ये ‘चित्रकला शिक्षण : सद्यस्थिती आणि आव्हाने’ यासंदर्भात विशेष ऊहापोह केलेला आहे. तो खरोखरच फार महत्त्वपूर्ण आहे. चित्रकला क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती आणि लेख यात आहेत. चित्रकलेच्या इतिहासासोबत वर्तमानाचा वेध घेणारा हा संदर्भग्रंथ त्यामुळेच आपला असा एक वेगळाच ठसा उमटवून जातो. ग्रंथाच्या संपादकीयातील खालील मजकूरही लक्षवेधी आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत एक कलाकार व कलारसिक आहेत. स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे अशी इच्छा नुकतीच त्यांनी बोलून दाखवली. तसे झाल्यास अण्णांचे (वसेकरांचे) स्वप्न पूर्ण होईल, तीच खरी त्यांना भावांजली ठरेल. मराठवाडय़ातील मागास भागातील असूनही अभिनव चित्रशाळेची झलक अनेक मान्यवरांना आकर्षित करणारी ठरली हे विशेष! म्हणून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या संस्थेस आवर्जून भेट दिली. यात कवी कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, द. मा. मिरासदार, राम शेवाळकर, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, एस. एम. जोशी, गोविंदभाई श्रॉफ, ना. ग. गोरे आदींच्या भेटीचा अभिप्रायासह पाठिंबा वसेकरांचे मनोबल प्रबळ करताना दिसून येतो. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. जसे की स्वा. सै. विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठान पुरस्कार, स्व. मीनाताई ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचा ‘नांदेड भूषण’ पुरस्कार इत्यादी.
‘भारतीय कलावंतांचा मनोधर्म’ या लेखात प्रा. भैयासाहेब ओंकार प्राचीन कलांचा वेध घेताना विधान करतात की, समाजाला मार्ग दाखविण्याची थोर शक्ती कलावंतांच्या ठायी असल्याचे मानले जात होते. अशा थोरांपैकी एक म्हणून त्र्यंबक वसेकरांचे नाव घेता येईल. त्यांनी आपले अख्खे आयुष्य कलेसाठी समर्पित केले; हे अनेक शिष्य कलावंतांच्या ऋणात्मक मनोगतातून दिसून येते. तसेच कौटुंबिक,विस्तारीत नातीगोती यांच्या मनोगत लेखातून दिसून येते.पल्लवी वसेकरने तर आजोबांच्या कलाकृतींची ओळख आपल्या लेखात सचित्रपणे करून दिली आहे. मेघदूत, धर्म आणि विज्ञान, स्त्राrरुप, संभ्रम… इत्यादी कलाकृती ग्रंथात (रंगीत) पाहायला मिळतात. ग्रंथाची अंतर्गत मांडणी, मुखपृष्ठ-मलपृष्ठ अतिशय समर्पक व देखणे झाले आहे.
व्यंकटेश देशपांडे या त्यांच्या माजी विद्यार्थ्याचा लेख हा त्र्यंबक वसेकर काही काळ छत्रपती संभाजीनगरला असतानाची आठवण करून देतो. तेव्हा संपादक अनंत भालेरावांनी मराठवाडा दैनिक पुरवणीसाठी कथा, कवितांवर रेखाटने, दिवाळी अंक मुखपृष्ठ तयार करण्याचे काम वसेकरांना दिले व त्यांनी कसे प्रतिसादले हे दिसून येते. वसेकर कलावंतच नाही तर लेखकही कसे होते याचाही उल्लेख पुस्तकांच्या प्रकाशनासहीत करण्यात आलेला आहे. अनेक इतर लेख, बालचित्रकला परीक्षा (25…50 वर्षांनिमित्त लेख) आदींचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. शेवटच्या भागात ‘नांदेडचे सांस्कृतिक धन हरपले’ (निधन-2006) याची दखल महाराष्ट्रभर अनेक वृत्तपत्रांनी घेतल्याचे बातमी/लेखातून दिसून येते. एकूणच कलामहर्षी त्र्यंबक वसेकरांविषयीचा हा जन्मशताब्दी ग्रंथ मराठवाडय़ाच्या शैक्षणिक, कलात्मक उंचीचा आलेख दर्शवणारा दस्तऐवज ठरतो.
कलामहर्षी त्र्यंबक वसेकर : एक ध्यासपर्व
संपादक : प्रा.सुरेखा दंडारे-वसेकर/अशोक दंडारे,
प्रकाशक : अभंग प्रकाशन, नांदेड,
पृष्ठे : 472, मूल्य : 800 रुपये