
धडधडणाऱ्या एका हृदयाने ठाणे ते मुंबई हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत केला आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलपासून धक धक धक धक करीत निघालेले हे हृदय मुंबईच्या गिरगावमधील रिलायन्स हॉस्पिटल पर्यंत सुखरूप पोहोचले. त्यामुळे एका रुग्णाला जीवदान मिळाले आहे. या अनोख्या हृदय प्रवासासाठी वाहतूक विभागाने ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. पोलिसांनी तर अवघ्या काही मिनिटांतच वाहतुकीचे नियोजन करून कमीत कमी वेळेत ठाण्याचे हृदय मुंबईच्या रुग्णालयापर्यंत नेले. डॉक्टर, कर्मचारी व वाहतूक पोलिसांच्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथून सायंकाळी ५.५५ वाजता ब्रेन डेड रुग्णाचे हृदय मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील रुग्णासाठी रवाना करण्यात आले. ठाणे ते मुंबई हा सुमारे ३५. ७ किमीचा प्रवास असून ठाणे हद्दीतील ज्युपिटर हॉस्पिटल ते आनंदनगर टोलनाका हा ६.१ किमीचा टप्पा पार करण्यासाठी वाहतूक पोलिसांना १४ मिनिटांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र दक्ष नियोजन आणि अचूक अंमलबजावणीमुळे ठाणे वाहतूक शाखेच्या पथकाने हा टप्पा अवघ्या आठ मिनिटांत पूर्ण करून हृदय वेळेत मुंबईतील रुग्णालयापर्यंत पोहोचवले.
अखेर जीवदान मिळाले
नियंत्रण कक्षातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रीन कॉरिडोरच्या संपूर्ण मार्गावर काटेकोर बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीतपणे वळविण्यात आली. दरम्यान, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. संतोष सोरटे आणि त्यांच्या पथकाने वैद्यकीय दक्षता घेत हृदय सुरक्षित व सुस्थितीत मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. त्यानंतर लगेच गरजू रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात आले.
एरवी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलीस तत्पर असतात. अनेकदा पोलिसी खाक्याही दाखवावा लागतो. मात्र शनिवारी याच पोलिसांमधील संवेदनशील ता जागृत असल्याचा प्रत्यय सर्वांना आला.
ग्रीन कॉरिडोरसाठी वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे (कापूरबावडी), पोलीस निरीक्षक सुरपाल बारेला (वागळे), पोलीस उपनिरीक्षक शंकर महाडिक (नौपाडा), पोलीस उपनिरीक्षक विजय हिंगे तसेच नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित पारधी व अन्य २५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते
हृदय प्रत्यारोपणासाठी मुंबईला रवाना करायचे आहे असा कॉल शनिवारी अर्धा तास आधी रुग्णालय प्रशासनाकडून आम्हाला आला. त्यानंतर लगेच सर्व तयारी करून ठाणे ते मुंबई असा एका हृदयाचा प्रवास सुरू झाला. ते हृदय मुंबईपर्यंत ग्रीन कॉरिडोरने सुरक्षित पोहोचवण्यात आले. गरजू रुग्णाला जीवदान देण्यामध्ये ठाणे वाहतूक शाखेचेही योगदान लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
पंकज शिरसाट,
(उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक विभाग)


























































