
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नव्या 9 पाहुण्यांचे जोरदार स्वागत झाले. आफ्रिकेतील बोत्सवाना येथून तब्बल 12 तांसाचा विमान प्रवास करून 9 नवे चित्ते हिंदुस्थानात दाखल झाले आहेत. या सर्व चित्त्यांना हेलिकॉप्टरद्वारे कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले आहे. या नव्या आगमनामुळे देशातील चित्त्यांची एकूण संख्या आता थेट 48 वर पोहोचली आहे. याआधी ही संख्या केवळ 39 होती.
कुनो येथे आणलेल्या नव्या चित्त्यांच्या फौजमध्ये 6 मादी तर 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. याआधी आणलेल्या चित्त्यांच्या संख्येत नरांची संख्या जास्त होती. परंतु, यावेळी मादी चित्त्यांची संख्या जास्त आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः क्रेटचे हॅण्डल फिरवून या चित्त्यांना क्वारंटाईन भागात सोडले. मादी चित्त्यांची संख्या वाढल्याने भविष्यात प्रजननाचा दर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास वन्यजीव तज्ञांनी व्यक्त केला आहे. या नव्या पाहुण्यांमुळे कुनोमध्ये एकूण 35 वयस्कर चित्ते झाले आहे. यात 18 मादी आणि 17 नर आहेत. हे सर्व 9 चित्ते पुढील एक महिना तज्ञांच्या देखरेखीखाली क्वॉरंटाईन राहतील. या काळात त्यांच्या आरोग्याची आणि इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यावर बारीक लक्ष असेल. बोत्सवाना सरकारने हिंदुस्थानला हे चित्ते सोपवले आहेत. प्रोजेक्ट चित्ता 2022 मध्ये नामीबियापासून सुरू झाले होते. त्यावेळी 8 चित्ते हिंदुस्थानात आणले होते. त्यानंतर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणले. आता बोत्सवानाहून ही तिसरी खेप आणली आहे. हिंदुस्थानी वायुदलाच्या विमानाने बोत्सवानाहून शुक्रवारी उड्डाण केले. रात्री 9 ते 10 च्या सुमारास ग्वॉलियरला पोहोचले. सर्व चित्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.



























































