कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या विरोधात बंगळुरूच्या फास्ट ट्रॅक कोर्ट 1 ने अजामीनपात्र वॉरेंट जारी केले आहे. सुनावणीला हजर राहत नसल्यामुळे बीएस येडियुप्पा यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी पोलिसांनी फास्ट ट्रॅक कोर्टात अर्ज दाखल केला होता.
अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने बीएस येडियुरप्पा यांच्यावर केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी येडियुरप्पा यांच्यावर पॉस्को कायद्यातील कलम 8 आणि भादवि कलम 354 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गेल्या महिन्यात पीडित महिलेच्या आईचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीला अद्याप अटक केली नाही, असा आरोप करत पीडितेने कर्नाटकच्या उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी बीएस येडियुरप्पा यांना 12 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. पोलिसांच्या नोटीसला प्रतिक्रिया देत येडियुरप्पा यांनी 17 जून रोजी चौकशीसाठी हजर राहणार, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी बंगळुरू येथील फास्ट ट्रॅक कोर्ट 1 मध्ये येडियुरप्पा यांच्या विरोधात अटक वॉरंटची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज (13 जून) सुनावणी पार पडली आणि बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.