
पाथर्डी तालुक्यातील हत्राळ–पाडळी रस्त्यावर आज पहाटे ऊसतोड कामगारावर बिबटय़ाने हल्ला केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात रामदास गोपीनाथ केदार (वय 59) हे गंभीर जखमी झाले आहेत. केदार यांना बिबटय़ाने सहा ठिकाणी चावा घेतला.
यावेळी दुचाकीवरून आलेल्या सोन्याबापू केदार यांनी आपल्या दुचाकीचा प्रखर झोत बिबटय़ावर मारत जोरात हॉर्न वाजवल्याने बिबटय़ाने धूम ठोकली. आज पहाटे केदार ऊसतोडीसाठी दुचाकीवरून हत्राळहून पाडळीच्या दिशेने जात होते. आसराजी टकले गुरुजी यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. केदार हे बिबटय़ाला प्रतिकार करत असताना बिबटय़ाने त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेले सोन्याबापू पोपट केदार यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकीचा लाइट बिबटय़ावर सोडत जोरात हॉर्न वाजवल्याने बिबटय़ाने धूम ठोकली. त्यामुळे रामदास केदार यांची सुटका झाली.
घटनेची माहिती कळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. या घटनेने हत्राळ व पाडळी परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.






























































