
बदलापूरची घटना ताजी असतानाच शिक्षकाने विद्यार्थिनीकडे व्याजाच्या पैशासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची घटना नेवासा तालुक्यात उघडकीस आली. नराधम शिक्षकाविरुद्ध अखेर लैंगिक छळ, विनयभंग, सावकरकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. नानासाहेब दानवे असे नराधम शिक्षकाचे नाव आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ओझर येथे प्राथमिक शाळेत तो कार्यरत आहे.
घटनेप्रकरणी नेवासा पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत होते. यामुळे विद्यार्थिनीने सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने अखेर थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून नेवासा पोलिसांना अखेर गुन्हा दाखल केला. पीडितेने कोरोना काळात आरोपी शिक्षकाकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात ती नियमित व्याज देत होती.
वेळेत व्याज देऊनही शिक्षक वारंवार पैशाची मागणी करीतच राहिला. मात्र पीडितेची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने ती पैसे देऊ शकली नाही. सदर विद्यार्थीनी शेतावर काम करण्यास गेली असता शिक्षकाने तेथे जाऊन तिच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर माझ्यासोबत शेतात एकटी ये आणि मला शरीर सुख दे अशी मागणी केली. शिवाय व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिली.
यानंतर पीडितेने सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली. शिक्षकी पेशाला काळिमा असणारा हा प्रकार गंभीर असून विद्यार्थिनीसह अजून एका महिलेने त्या शिक्षकांच्या गैर कृत्याबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे. मात्र अद्याप पोलिसांनी त्या शिक्षकाविरुद्ध कुठलीही कारवाई न केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.