मुंबई-बडोदा महामार्गावर लामजला एण्ट्री-एक्झिट पॉइंट, 1३2 कोटींची निविदा काढली

भिवंडी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-बडोदा महामार्गाचा वापर स्थानिकांना करता यावा यासाठी लामज येथे एण्ट्री-एक्झिट पॉइंट तयार करण्यात येणार आहे. या एण्ट्री- एक्झिटसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली असून या कामासाठी 1३2.28 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. लामज येथे एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट तयार करण्याची मागणी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून लावून धरली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.

मुंबई-बडोदा महामार्गाला लामज येथे एण्ट्री आणि एक्झिट मिळावी यासाठी संघर्ष समितीने भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. बाळ्यामामा यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत या विषयाचा सतत पाठपुरावा केंद्रीय स्तरावर केला होता. खासदार बाळ्यामामा यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवत या कामासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लामज येथे एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट तयार करण्यासाठी कामाची निविदा काढली. लामज येथे एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट तयार होणार असल्याने भिवंडीकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

भिवंडीकरांना दिलासा

मुंबई-बडोदा महामार्गाला लामज येथे एण्ट्री आणि एक्झिट मिळावी, ही मागणी आपण गेल्या अनेक महिन्यांपासून लावून धरली होती. आता या कामाची निविदादेखील जाहीर झाली आहे. लामज येथे एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट तयार होणार असल्याने भिवंडीकरांना मोठा दिला मिळाला आहे अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे.