कवितांमधून प्रशासनाचा निषेध; साहित्यकणा फाउंडेशनचा उपक्रम

तपोवनातील वृक्षांच्या संरक्षणासाठी आता नाशिक शहरातील कवी सरसावले आहेत. साहित्यकणा फाउंडेशनच्या वतीने रविवारी तपोवनात वृक्ष संवर्धन कवी संमेलन पार पडले. यात वृक्ष वाचवा असा संदेश देणाऱया पन्नासहून अधिक कविता सादर झाल्या. सहभागी कवी, कवयित्री साहित्यिकांनी वृक्ष संवर्धनाची महती सांगून प्रशासनाचा निषेध केला.

रविवारी सकाळी 10 वाजता तपोवनात हे वृक्ष संवर्धन कवी संमेलन पार पडले. त्यात डॉ. प्रशांत अंबरे यांनी स्वरचित ‘कुंभमेळा’ कविता सादर केली. कवी राजेंद्र उगले यांनी ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली, रामभूमीतील झाडे आज बोलली’ अशा शब्दात झाडांच्या व्यथा मांडल्या. ‘रक्त सांडले तरी बेहत्तर मोडू तयांची हाडे, खबरदार जर कोण तोडेल तपोवनातील झाडे’ ही कविता सादर करून कवी संजय आहेर यांनी वृक्षतोडीला विरोध दर्शविला.

‘वृक्ष म्हणजे गारवा, वृक्ष म्हणजे सावली, वृक्ष म्हणजे विसावा, वृक्ष म्हणजे माऊली, कत्तल रे कशासाठी, मानवा त्याची लावली’ असे म्हणत जागृती पाठक रणभोर यांनी प्रशासनाचा निषेध केला. कवी शिवराज शिरसाठ यांनी ‘सुरक्षित ठेवू तपोवन, नको वृक्षवल्लीचा खून’ असे खडेबोल सुनावले. कविता कासार यांनी ‘उन्हातल्या एका वाटसरूला सावलीचा गारवा शोधत होता, त्याच्या तळपणाऱया मनाला थंडगार निवांत हवा होता’; कवी राजेश्वर शेळके यांनी ‘झाड ऐकले ऐकले, पडे घावावर घाव, लाकडाचा दांडा येई लाकडाच्या मुळावर’; कवी रविकांत शार्दुल यांनी ‘श्रीरामाच्यापासून भूमीत चालवती कुऱहाड रे, तपोवनातील महावृक्ष हे झाले केविलवाणे रे’ म्हणत झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. चिमुकली कवयित्री ब्रिहा महाजन हिच्या कवितेने सर्वांचे मन हेलावले. समारोपाला सचिव विलास पंचभाई यांनी ‘घाव घालतो काळजावर तुला शाप लागणार नाही, मेल्यावर तुला लाकडं मिळणार नाही’ म्हणत तळतळाट व्यक्त केला.

प्रमोद चिंचोले, रवींद्र दळवी, अर्जुन वेलजाळी, संजीव अहिरे, राजेश जाधव, शिवाजी ठाकरे, माणिक गोडसे, शीला जाधव, सीमाराणी बागुल, प्रकाश अहिरे, सुनील गायकवाड, पंढरी पगारे, दत्तू दाणी, स्वप्नील धने, पुष्पलता गांगुर्डे, पूजा बागुल, साहेबराव पवार, उमाकांत दहाड, सुनील गायकवाड, राजू सावंत, भगवान मार्तंड, शिवाजी ठाकरे यांच्यासह सर्वच कवींनी आपल्या शब्दातून वृक्षसंवर्धनाचा जागर मांडला. नमस्ते फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कवींचा सन्मान करण्यात आला.

अखिल भारत हिंदू महासभा नाशिक शाखेच्या वतीने रविवारी तपोवनातील झाडांचे पूजन करून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. तपसाधना करणारे साधूमहंत अशा वृक्षतोडीला कदापी मंजुरी देणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. त्याप्रसंगी पंडितराव देशमुख, होराभूषण मनीष गोसावी, पंकज चव्हाण, अभिषेक शेळके, विष्णू हिरे आदी उपस्थित होते.