आळंदी प्रशासनाच्या सतर्कतेमुळे इंद्रायणीत बुडणाऱ्या महिलेचे वाचले प्राण

आळंदी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यामुळे इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या महिलेचे वाचले आहेत. कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. उषाताई शेटे असे बुडणाऱ्या महिलेचे नाव आहे. शक्ती लोकरे असे महिलेला वाचवणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छतेचे काम करत असताना इंद्रायणीत महिला बुडत असल्याचे आळंदी नगरपरिषद बाह्यसेवा कर्मचारी शक्ती लोकरे यांनी पाहिले. लोकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदी पात्रात उडी मारून महिलेला बाहेर काढले. लोकरे यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मुख्याधिकारी यांच्या सुचनेनुसार नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांनी तात्काळ नगरपरिषद कर्मचारी व अँब्युलन्स घटनास्थळी पाठविली.

आळंदी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी महिलेला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. महिलेला जीवदान देणारे शक्ती लोकरे आणि तिच्यावर तात्काळ उपचार करणारे ग्रामीण रुग्णालय प्रशासन यांचे जनतेकडून कौतुक होत आहे.