
लहान मुली, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आज मानखुर्दमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात एका गोणीत कोंबलेला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून राज्यात महिला, मुली सुरक्षित आहेत का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहेत.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात मेट्रो कारशेडचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे आहेत. तेथील एका मातीच्या ढिगाऱ्याजवळ शुक्रवारी काही कामगारांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना सांगितले. कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांनी तेथे जाऊन पाहणी केली असता एका गोणीत कोंबलेला महिलेचा मृतदेह मिळून आला. त्यामुळे तत्काळ याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.
गोणीत महिलेचा मृतदेह सापडल्याचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर महिला व लहान मुलींमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी तो मृतदेह राजावाडी इस्पितळात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख पटली नसून तिची हत्या करून मग मृतदेह गोणीत भरून त्या ठिकाणी फेकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ट्रॉम्बे पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहेत.