
मुंबईतील वाढती महागाई, घरभाडय़ातील वाढ आणि स्थलांतरित रहिवाशांना भाडय़ाने घर मिळण्यात अडचणी येत असताना म्हाडाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना सध्या फक्त 25 हजार रुपये भाडे दिले जात आहे. ही रक्कम तुटपुंजी असून गोरगरीब रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे या रहिवाशांना किमान 40 हजार रुपये भाडे द्यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हाडाकडे केली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन तेथील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलेल्या रहिवाशांना म्हाडाकडून सध्या दरमहा 25 हजार रुपये इतके घरभाडे दिले जात आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच घरभाडय़ात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर बीडीडीवासीयांना दिल्या जाणाऱ्या भाडय़ाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी 18 नोव्हेंबर 2025 रोजी म्हाडाकडे केली होती. म्हाडाने यासंदर्भात निर्णय न घेतल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा या मागणीसंदर्भात म्हाडाला स्मरणपत्र लिहिले आहे. रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन या प्रकरणी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.





























































