‘मेघा’ घोटाळ्यातील ‘भ्रष्टनाथ’, शिंदेंना मंत्रीपदावरून हटवा! घोडबंदर-भाईंदर उन्नत मार्ग, बोगदा कामाच्या घोटाळ्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक

घोडबंदर ते भाईंदर रस्ता आणि उन्नत मार्ग प्रकल्पाच्या 14 हजार कोटींच्या कामात तत्कालीन मिंधे सरकारने कोटय़वधींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते– युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. मर्जीतल्या कंत्राटदाराला फायदेशीर ठरणाऱया अटी-शर्ती बनवल्याचे लक्षात आल्यानंतर मी हा घोटाळा उघड केला होता. यानंतर ‘एमएमआरडीए’ने या अटी बदलल्या होत्या. त्यामुळे या ‘मेघा’ घोटाळय़ातील भ्रष्टनाथ शिंदेंना मंत्रीपदावरून हटवा आणि ईडी, आयटी किंवा न्यायालयीन चौकशी करा. तोपर्यंत मिंध्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवा, अशी मागणीही शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

घोडबंदर-भाईंदर मार्गासाठी गतवर्षी 14 हजार कोटींच्या निविदा एमएमआरडीएकडून काढण्यात आल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांनी या कामातील घोटाळा ‘मातोश्री’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड केला. सर्व नियमांची पायमल्ली करीत या निविदेसाठी केवळ 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला. याबाबत मी आवाज उठवल्यानंतर हा कालावधी 60 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला. शिवाय या कामासाठी आरबीआयची मान्यता नसलेल्या सेंट लुसिया देशामधील बँकेची 1600 कोटींची ‘बँक गॅरंटी’ घेण्यात आली होती. हा प्रकारही आपण उघड केला होता. या निविदेत अनियमितता झाल्यामुळेच सरकारवर निविदा नव्याने राबवण्याची नामुष्की आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

असे आहे प्रकरण

  • निवडणूक काळात भाजपला 600 कोटींचे ‘दान’ देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगला पंत्राट देण्यासाठी गोलमाल करणारे महायुती सरकार सर्वोच्च न्यायालयात तोंडावर आपटले. या मार्गासाठीच्या निविदा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. त्यामुळे घोटाळय़ात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणाऱ्या कंपनीचेही आदित्य ठाकरे यांनी काैतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी नैतिकता दाखवावी

टेंडर काढताना शिंदे मुख्यमंत्री पदावर होते. नगरविकास खातेही त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा करणाऱया मुख्यमंत्र्यांनी राज्याची काळजी असल्यास या घोटाळय़ाच्या चौकशीचे आदेश देऊन नैतिकता दाखवावी, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना दिले. मिंध्यांचा घोटाळा ‘चंदा दो, धंदा लो’ या स्किमचे उदाहरण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.