
वांद्रे पूर्व येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आमचा महापौर बसल्यानंतर मुंबईतील सुमारे चार हजार प्लॉट्सवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरांची उभारणी करण्यात येईल. पोलीस कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, बेस्टचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना मुंबईत हक्काची घरे दिली जातील, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “मीही याच मतदारसंघाचा रहिवासी आहे. मी इथे आमदार म्हणून नाही, तर या मतदारसंघाचा रहिवासी, तुमचा शेजारी म्हणून आलो आहे. एक वर्षांपूर्वी आपलं सरकार जरी आलं नाही, तरी आपल्या आमदारांनी मतदारसंघात केलेली कामं पाहून अभिमान वाटतो. विशेषतः आपल्या पक्षाचे स्थानिक आणि तरुण आमदारांनी केलेल्या कामांमुळे आम्ही काम करून दाखवतो, हा विश्वास अधिक बळकट होतो.”
महायुतीच्या प्रचारावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, “आज मिंधेंची सेना, दादांची टोळी किंवा फडणवीस साहेबांची टोळी यांचा प्रचार भलत्या–सलत्या विषयांवर आधारित आहे. देशाच्या सीमांबाबत, कायदा-सुव्यवस्थेबाबत बोललं जातं; पण मुंबईसाठी नेमकं काय करणार, याचं उत्तर नाही. आम्ही मात्र काय काम करणार आहोत आणि लोकांना काय देणार आहोत, यावरच लक्ष केंद्रित केलं आहे.”
घरांच्या प्रश्नावर भर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “घरांचा प्रश्न हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बीडीडी चाळींचा प्रश्न असो किंवा गव्हर्नमेंट कॉलनींचा प्रश्न असो, हा विषय आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. ‘गोळी लो, खिचखच दूर करो’ अशा घोषणा देण्याचा आमचा प्रकार नाही. आजपर्यंत आमदारांनी केलेली कामं पाहिली, तर पुढचा टप्पा म्हणजे घरांचा प्रश्न सोडवणं हेच आहे.”
ते पुढे म्हणाले की, “हा विषय केवळ आजचा नाही. उद्धव साहेबांसाठी, माझ्या आजोबांसाठी आणि आमच्यासाठीही तो तितकाच महत्त्वाचा राहिला आहे. आम्ही हा प्रश्न एक कर्तव्य म्हणून पाहतो. शासनाचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, बेस्टचे कर्मचारी, पोलीस कर्मचारीज्या लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी 30–40 वर्षे, पिढ्यानपिढ्या सेवा केली आहे, त्यांना मुंबईत हक्काचं घर मिळायलाच पाहिजे. या ध्येयाने आणि धोरणाने आम्ही पुढे चाललो आहोत.”
आदित्य ठाकरेंनी सांगितले की, “हा संघर्ष नवा नाही. घरं कशी द्यायची, यासाठी अनेक वर्षे मोर्चे काढले गेले, आंदोलनं झाली. अनिल परबजी यांनी सांगितल्याप्रमाणे हा विषय तब्बल 21 वर्षे अधिवेशनात मांडला गेला. तरीही प्रश्न सुटत नसेल, तर त्याचं उत्तर एकच आहेभाजप.”
पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रश्नाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “30 वर्षे सेवा करूनही पोलीस कर्मचाऱ्यांना घर मिळत नसेल, तर याला जबाबदार कोण आहे, हे स्पष्ट आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो असता, ‘एकाला घर दिलं तर सगळ्यांना द्यावं लागेल’ असं सांगण्यात आलं. पण आमचं उत्तर स्पष्ट होतंहो, सगळ्यांनाच घर दिलं पाहिजे. आणि आम्ही ते करून दाखवलं आहे. बीडीडी चाळींचा विकास केला, पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना घरे दिली. मग अडचण नेमकी कुठे आहे?”
गव्हर्नमेंट कॉलनीच्या जागेसंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले की, “आज आपण आंदोलन करत आहोत कारण आपल्याला आठ, नऊ, दहा एकर जागा हवी आहे आणि ती आपण मिळवणारच. मुख्यमंत्री ‘आम्ही देणार नाही’ असं म्हणाले, तरीही ही जागा आपण मिळवून घेणार आहोत.”
मुंबई महानगरपालिकेच्या वचननाम्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “वचननाम्यातील पहिलं वचन हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये महानगरपालिकेच्या साडेचार हजार इस्टेट प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीज एका बिल्डर मित्राच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचा महापौर बसल्यानंतर पहिला निर्णय हा असेल की या सर्व प्रॉपर्टीज परत घेतल्या जातील आणि सुमारे चार हजार प्लॉट्सवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली जातील.”
पोलीस, महानगरपालिका, बेस्ट आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले की, “हा निर्णय हवेतला नाही. आर्थिक नियोजन करूनच हा फुल अँड फायनल निर्णय घेतला आहे.”
ते पुढे म्हणाले, “500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे, तो 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार आहोत. 100 युनिटपर्यंत वीज माफ करणार आहोत. महिलांसाठी मोफत बससेवा सुरू करणार असून 10,000 इलेक्ट्रिक बस पुन्हा आणणार आहोत. पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहेघरांचा प्रश्न.”
शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले की, “आम्ही सगळं करत आहोत, वचनपूर्ती करणारच. पण तुमच्याकडून आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहेमतदान. एक मत तुमच्या घरांसाठी, तुमच्या आवाजासाठी निर्णायक ठरणार आहे. त्या विश्वासावर आमचा पहिला निर्णय हाच असेल की, तुमच्या घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणारम्हणजे लावणारच.”



























































