शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची धारावी येथे मुंबई रक्षण सभा रविवारी पार पडली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटाची सालटी काढली. ”मिंधे भाजप अदानीच्या खिशात व मुंबई अदानीच्या घशात असं वातावरण होत चाललं आहे. हे धारावीच्या नावावर संपूर्ण मुंबई लुटायला निघाले आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
”हम सब एक है. हाच नारा फार महत्त्वाचा आहे. ही सभा जेव्हा लावली गेली तेव्हा मला सांगितलं की धारावीत मुंबई बचाव आंदोलन घेत आहोत. तेव्हा मी सांगितलं की आता बचाव हे चालणार नाही, आता रक्षण करावं लागणार. त्यामुळे मुंबई धारावी रक्षणासाठी आपण आज रस्त्या्वर उतरलो आहोत. हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्ष धारावीच्या पुनर्विकासावर वेगवेगळ्या स्तरावर चर्चा चालत आली आहे. फडणवीसांचं सरकार असताना एक टेंडर निघालं होतं. त्यात अनेक त्रुटी होत्या त्यामुळे आपण ते रद्द केलं. त्यानंतर आपण धारावीच्या पुनर्विकासाचं काम मार्गी लावत होतो. कलानगर हे धारावीच्या शेजारी आहे. त्यामुळे मी शेजारधर्म पाळतोय. दोन वर्षांपासून आपण धारावी पुनर्विकासासाठी एक आंदोलन हाती घेतलं आहे. आपला विरोध कुठल्या एका व्यक्तीला नाही. आपला विरोध त्या व्यक्तीबद्दल आहे जे मुंबईला लुटायला, विकायला निघाले आहेत. त्यांना विरोध करणारच. त्यांना मुंबई लुटू द्यायची नाही. त्यांना मुंबई विकू द्यायची नाही. असं सहज मुंबईला मोड़ून गुजरातला नेता येत नाही म्हणून हे मिंधे भाजप सरकारला मुंबई एका उद्योजकाच्या घशात घालायची आहे. मिंधे अदानीच्या खिशात व मुंबई अदानीच्या घशात असं वातावरण होत चाललं आहे. आपण पाहतोय की जे टेंडर निघाले ते 300 एकरचं टेंडर निघायला हवं होतं. पण ते 500 एकरचं निघालं आहे. त्यात रेल्वेची जमीन आहे, माहिम नेचर पार्कची जमीन आहे, टाटा पावर हाऊसची जमीन आहे. धारावीच्या नावावर संपूर्ण मुंबई लुटायला निघाले आहेत हे. शंभर दीडशे वर्षांपूर्वी इस्ट इंडिया कंपनी आपल्या देशाला निघायला निघाली होती. त्या कंपनीसारखीच विचारधारा भाजप व मिंध्यांची आहे. अदानी समूहामार्फत ते असंच करंत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
”धारावीचा विकास सर्वांना हवा आहे. आम्हाला धारावीच्या हक्काची घरं पाहिजे, अदानीच्या घशात न गेलेला विकास पाहिजे. इथल्या इथे विकास पाहिजे. आमच्या डोळ्या देखत विकास झाला पाहिजे ही शपथ घ्यायला आपण आलो आहोत. यांना धारावी घशात पाहिजे. मुंबईतील 20 भूखंड फुकटात अदानीला देतायत. धारावीच्या 300 350 एकरचा पुनर्विकास करत असताना अदानीला स्वत:चा विकास करून घ्यायचा आहे. करा विकास पण आमच्या लोकांना आम्ही इथून बाहेर काढू देणार नाही. कुठल्याही परिस्थिती आम्ही धारावीकरांना हात लावू देणार नाही. पुनर्विकास धारावीचा पाहिजे, अदानीचा विकास नको. इथे ज्या इमारती होतील त्या धारावीकरांच्या होतील हा विश्वास आम्हाला पाहिजे. भाजप मिंधेंचे खरे मालक अदानी आहेत. त्यामुळे मालका समोर हो बोलावलंच लागतं, त्यामुळे ते जे काही बोलतात त्याला हे हो बोलतात”, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात निवडणूक घ्यायची परवानगी भाजपने दिलेली नाही
महाराष्ट्रातील निवडणूका जाहीर न केल्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप व निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ”परवा हरयाणा जम्मू कश्मीरची निवडणूक निवडणूक आयोगाने लावली. पण भाजपच्या कार्यालयातून चालणाऱ्या निवडणूक आयोगाला भाजपने महाराष्ट्राची निवडणूक लावायची परवानगी दिलेली नाही. एवढी भीती भाजपच्या, मिंध्यांच्या व त्यांच्या अलीबाबा चाळीस चोरांच्या मनात आहे. हे जे पंधरा लाखांपासून सुरुवात केलेले आता 1500 रुपयांवर आले आहेत. आमदारांना 50 खोके आणि महिलांना 1500. आता सांगतायत की आमचं सरकार पुन्हा निवडूनन द्या आम्ही वाढीव रक्कम देऊ. हिंमत असेल तर ते वाढीव आतापासून द्या. मुंबई महाराष्ट्र लुटायची. संपूर्ण मुंबई पिळून काढायची आहे यांना पण निवडणूक घ्याचची नाही. निवडणूक घ्यायच्या आधी हिंदू मुस्लिमांमध्ये, जातीपातींमध्ये वाद निर्माण करायचे. सगळ्यांमध्ये वाद निर्माण करायचे हे भाजपचं राजकारण आहे. पण आता कितीही वाद निर्माण करायचा प्रयत्न करा हा महाराष्ट्र तुमच्यासमोर झुकणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे.
”धारावीकरांना 350 चौरस फुटांचं नाही तर 500 चौरस फुटाचं घऱ मिळालंच पाहिजे हे महाविकास आघाडीने ठरवलं आहे. पात्र अपात्र काहीच नाही. धारावीतील प्रत्येक व्यक्ती पात्र ठरलाच पाहिजे हे महाविकास आघडीचं काम असेल. विधानभवनात ही मागणी केलेली आहे. महाराष्ट्रात अनेक बहुमजली झोपडपट्ट्या आहेत. त्यांचा देखील विचार महाविकास आघाडी करणार. अनेक वर्ष हा विकास रखडला आहे. मध्यंतरी आपले केंद्रीय मंत्री पीयूष गोय़ल यांनी सांगितलेले की झोपडपट्टी मुक्त मुंबईचं माझं स्वप्न आहे . बाळासाहेबांनी देखील स्लमफ्री मुंबईचं स्वप्न बघितलं होतं. पण त्यांचं म्हणनं होतं की झोपडपट्टीधारकांना तिथल्या तिथे घऱ द्यायचं. पण पीयूष गोयल यांचं जे स्वप्न आहे त्यात त्यांना स्लममधील लोकांना मिठागरात टाकायचा आहे. आता लोकांनी ठरवायचं की त्यांना कुठे राहायचं? असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘महाराष्ट्राच्या विकासाबाबत जी पोटदुखी आहे भाजप मिंध्यांच्या मनात ती दुर्दैवी आहे. दोन वर्षांपूर्वी हे खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवल्यानंतर अनेकांना वाटलेलं की महाराष्ट्राचा विकास होईल, तरुणांना नोकऱ्या मिळतील, शेतकरी खुश होतील मात्र यातलं काहीच झालं नाही. महिला सुरक्षेबाबत बोलूच नका. शीव रुग्णालयात महिला डॉक्टरवर हल्ला झाला. 17हजार पदांसाठी 18 लाख मुलं पोलीस भरतीसाठी आली होती. यावरून नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्राची परिस्थिती दिसून येतेय, असे आदित्य ठाकरे म्हणाले.