वेबसाइट क्रॅश, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ… विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; अकरावी प्रवेशावरुन आदित्य ठाकरे यांची टीका

राज्यभरातील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांवर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची टांगती तलवार आहे. राज्यात 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध असूनही आतापर्यंत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करत त्यांना जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.

आदित्या ठाकरे यांनी ट्वीट करत सरकारचा समाचार घेतला. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घातले आहे. सतत वेबसाइट क्रॅश, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ… होत आहे. परिणामी ऑगस्ट महिना संपत आला तरीही सुमारे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक बिघाडाशिवाय स्थिर प्रवेश प्रक्रिया राबवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण सरकार ह्या जबाबदारीपासून पळतंय किंबहुना त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाहीए, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

25 ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर

अकरावीच्या प्रवेशापासून 2 लाख विद्यार्थी वंचित असल्यामुळे शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचे आयोजन केले आहे. 23 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी करता येईल. 25 ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल.

अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी