मुंबादेवी मंदिर परिसराबाबतचे मिंधेचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवी मंदिराच्या मागे शाळेचे रिझर्व्हेशन असलेल्या जागेवर 17 मजली पार्किंग इमारत उभारली जात आहे. त्या ठिकाणची पिढ्यानुपिढ्या सुरू असलेली दुकाने हटविण्याच्या प्रयत्न सुरू आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे. तसेच या दुकानदारांना तेथून हटविण्याचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे.

आदित्य ठाकरे यांनी शनिवारी मुंबईचे ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी X या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करत मिंधे सरकारवर टीका केली आहे. ”मुंबादेवी मंदिरामागे असलेले शाळेचे रिझर्व्हेशन बदलून तेथे 17 मजली पार्किंग इमारत उभारली जात आहे. ज्यामुळे मंदिराचे महत्त्व आणि सौंदर्यामध्ये बाधा निर्माण झाली आहे. मिंधे सरकार आपली ‘लाडका कॉन्ट्रॅक्टर’ योजना इथे राबवू पाहत आहे, तर स्थानिक आमदार सुशोभीकरणाच्या नावाखाली परिसरातील दोन पिढ्या सुरू असलेली दुकाने हटवण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रकारच्या सुशोभीकरणास आमचा विरोध आहे. मुंबादेवी हे मुंबईचे ग्रामदैवत असून येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराच्या परिसरात असलेले दुकानदार अनेक वर्षे येथे व्यवसाय करत आहेत. त्यांना येथून हटवण्याचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही”, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे.

या पोस्टसोबत आदित्य ठाकरे यांनी काही मागण्या देखील केल्या आहेत. ”आमची मागणी आहे की, येथील डम्पयार्ड त्वरित हटवावं. कार पार्किंग रद्द करून ती जागा मंदिराच्या सभा मंडपास द्यावी. भक्तांच्या हिताचा विचार व्हावा”, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.