
अवघ्या दोन तासांच्या अवकाळी पावसामुळे गुरुवारी पुण्यात झालेल्या पूर परिस्थितीवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱयांना फटकारले आहे. पुण्यात झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा चार तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता; मात्र या पावसाने प्रशासनाचे आणि ट्रिपल इंजिन सरकारचे अपयश अधोरेखित केले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
पुण्यातील पावसामुळे झालेल्या दैनावस्थेवरून आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पुण्यातील पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱयांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष त्यामागचे मूळ कारण असल्याचे ते म्हणाले.
2021 मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून मी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते. नदीच्या नैसर्गिक व मूळ रेड-ब्लू फ्लड लाईन्स पुन्हा निश्चित करणे अत्यावश्यक आहे. सलीम अली पक्षी उद्यान पुनर्जीवित केले होते, जे आज पुन्हा ढिगाऱयांनी भरले जात आहे. वेताळ टेकडी आणि इतर मोकळय़ा जागांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नव्हे
मागील चार वर्षांपासून पर्यावरणतज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्याने विनाशाकडे नेणाऱया प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत.
अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाईन्समध्ये केलेले बदल, वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत.
फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही. गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरे जावे लागेल आणि ‘विकास’ च्या नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
पुण्याची वाटचाल वॉटर किंगडमकडे – वडेट्टीवार
पुणेकरांनी भाजपला भरभरून दिले. 6 आमदार, 119 नगरसेवक, 1 खासदार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या पुणे शहरात राहतात. असे असताना काल अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात हे शहर अक्षरशः बुडाले. स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडमकडे वाटचाल करत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. इतरवेळी व्रेडिट घेण्यासाठी पुढे येणारे पुण्याचे स्वयंघोषित शिल्पकार यांनाच याचे श्रेय दिले पाहिजे. पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी मिळाली. अजून किती विकास पुणेकरांना हवा आहे? असा उपरोधिक सवाल वडेट्टीवार यांनी केला.
























































