28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा एक फ्रॉड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल रिचार्जची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ग्राहकांचे इनकमिंग कॉल्स आणि एसएमएस बंद करण्याच्या टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणाबाबत आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आवाज उठवला. 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा एक फ्रॉड आहे. ही कोट्यवधी सामान्य ग्राहकांची लूट असल्याचे त्यांनी म्हटले. याबद्दल राघव चड्ढा यांनी आज ‘एक्स’वर पोस्ट लिहून माहिती दिली. त्यांनी म्हटलंय, ‘रिचार्ज संपल्यावर आऊटगोइंग कॉल बंद होणे समजू शकतो, पण इनकमिंग कॉल्स आणि विशेषतः एसएमएस का बंद केले जातात?

वर्षाच्या 12 महिन्यांसाठी 13 रिचार्ज

28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा घोटाळ्यासारखा आहे. त्यामुळे वर्षाचे 12 महिने असूनही 13 वेळा रिचार्ज करावे लागते. खरं तर रिचार्ज प्लॅनची वैधता कॅलेंडरच्या महिन्यांप्रमाणे 30-31 दिवसांची असली पाहिजे. मात्र लोकांना एक अतिरिक्त रिचार्ज करावा लागतोय.

टेलिकॉम कंपन्या फक्त नफा कमवण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकत आहे. पूर्वी व्हॅलिडिटी संपल्यानंतरही अनेक दिवस इनकमिंग सेवा सुरू असायची, मात्र आता कंपन्यांनी हे नियम बदलले आहेत. सरकारने आणि ‘ट्राय’ने हस्तक्षेप करावा, असे ते म्हणाले.