दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामिनावर सुटलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांची आजपासून सुरू होणारी पदयात्रा स्थगिती करत पुढे ढकलण्यात आली आहे. ही पदयात्रा राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.
मनीष सिसोदीया दिल्लीतील नागरिकांच्या भेटीसाठी ग्रेटर कैलास येथून आज पदयात्रा सुरू करणार होते. मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा एक-दोन दिवस पुढे ढकलण्यात यावी, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मनीष सिसोदिया यांची ही पदयात्रा 14 ऑगस्ट ऐवजी 16 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी सौरभ भारद्वाज यांनी ध्वजारोहणाच्या वादावर आपले मत मांडले. ‘निवडून आलेल्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्याने 15 ऑगस्टला ध्वजारोहण केल्यास दिल्लीतील लोकांमध्ये आदर निर्माण होतो. स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा आहे की निवडून आलेल्या लोकांनी देश आणि राज्य चालवावे, लादलेल्या लोकांनी नव्हे’, असे ते यावेळी म्हणाले.
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागले आहेत. भलेही त्यांना सरकारमध्ये आता कोणतेही पद नाही. मात्र सिसोदीया यांच्या सल्ल्यानेच दिल्ली सरकार चालेल. याआधी सिसोदिया यांनी सोमवार आणि मंगळवारी आमदार आणि नगरसेवकांची बैठक घेतली होती. आता ते घरोघरी जाऊन दिल्लीच्या लोकांची भेट घेणार आहेत.