महिला आरक्षण विधेयकावरून भाजपचा ‘निवडणूक ड्रामा’; आप खासदार संजय सिंह यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी महिला आरक्षण विधेयकावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हा केवळ निवडणूक ड्रामा करत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी केला. ‘एएनआय’ने (ANI) ने दिलेल्या वृत्तानुसार, मथुरेतील पदयात्रेदरम्यान त्यांनी हे विधान केले.

संजय सिंह म्हणाले की, जेव्हा हे विधेयक यापूर्वी मांडण्यात आले होते, तेव्हा आम आदमी पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर पूर्वी कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि आता निवडणुका जवळ आल्यावर राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा समोर आणला आहे.

“जेव्हा आम्ही सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता, तेव्हा पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महिलांच्या उत्थानामुळे देशाचा विकास होईल, हे त्यांना तेव्हा उमजले नव्हते का? निवडणुकांसाठी केवळ नाटक करणे ही भाजपची सवय झाली आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.