‘आप’ची आत्महत्या

163

मोदी लाटेचा पराभव करून दिल्ली विधानसभा जिंकणाऱया केजरीवाल यांचे जाहीर अभिनंदन आम्ही केले होते. आज त्यांच्या पराभवाची आम्हांस खंत नाही. कारण मिळालेली सत्ता सत्कारणी लावली नाही व सोन्यासारखी संधी गमावत त्यांनी व त्यांच्याआपपक्षाने आत्महत्या केली.

राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असल्याचे नेहमीच म्हटले  जाते, पण राजकारणात नक्की बदमाश कोणास म्हणावे हा प्रश्न आहे. राजकारण हा बुद्धिबळाचा पट आहे असेही अनेकांना वाटते, पण दिल्ली महानगरपालिकेचे निकाल व त्यानंतरची पोपटपंची पाहता राजकारण म्हणजे मूर्खांची शेवटची ‘उडी’ मानायला हरकत नसावी. दिल्ली महानगरपालिका निवडणुकांत केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’ पक्षाने आत्महत्या केली आहे. पराभव अतिदारुण आहे. केजरीवाल यांना जमिनीवर आणून आपटणारा हा पराभव आहे, पण या पराभवास मोदी यांची लाट जबाबदार नसून केजरीवाल यांचा मूर्खपणा कारणीभूत आहे. राजकीय आखाडय़ात व खासकरून निवडणुकीत हार-जीत होतच असते. विजय पचवताना अनेकदा पराभवदेखील खिलाडू वृत्तीने स्वीकारायचे असतात. केजरीवाल यांना हे मान्य नाही. महानगरपालिका पराभवाचे खापर त्यांनी ‘ईव्हीएम’वर  फोडले आहे. भारतीय जनता पक्षाने मतदान यंत्रांत घोटाळे करून विजय मिळवल्याचा आक्रोश केजरीवाल आणि त्यांचे लोक करीत आहेत. दिल्लीत एकूण तीन महानगरपालिका आहेत – उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली. अशा तिन्ही महानगरपालिकांत केजरीवाल यांचा ‘आप’ पक्ष लोकांनी जमीनदोस्त केला आहे. भारतीय जनता पक्ष तिन्ही महानगरपालिकांत आधी सत्तेवर होताच. त्यांनी ही सत्ता कायम राखली. त्यामुळे केजरीवाल यांनी काहीच गमावले नाही व भाजपने कमावले नाही. तिन्ही महानगरपालिकांत

भाजपचा कारभार ढिसाळ

होता. भ्रष्टाचाराचे आरोप सर्वच नगरसेवकांवर होत राहिले. त्यामुळे  तिकीट वाटपात सर्वच जुन्या नगरसेवक मंडळींना ‘नारळ’ देण्याचे धाडस ‘भाजप’ने दाखवले व कोरी पाटी घेऊन ते निवडणुकीत उतरले. त्याचा फायदा तर भाजपला झालाच, शिवाय ‘विधानसभेची संपूर्ण सत्ता केजरीवाल यांच्या हाती देऊन त्यांनी असे काय दिवे लावले?’ हा प्रश्नही लोकांच्या मनात होताच. दोनेक वर्षांपूर्वी मोदी यांची लाट अडवून दिल्लीकरांनी केजरीवाल यांना सत्ता दिली ती उत्तम कारभार करून विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, पण केजरीवाल हे अधिकाराच्या प्रश्नांवर राज्यपालांशी भांडत राहिले. स्वतःचेच डोके भिंतीवर आपटून भिंत फोडण्याच्या प्रयत्नात आता त्यांचा कपाळमोक्ष झाला. केजरीवाल यांचा भांडखोर स्वभाव पाहता त्यांना भांडणातच गुंतवून ठेवायचे ही भाजपची खेळी असावी. त्यात ते यशस्वीही झाले. भ्रष्टाचाराचे आरोप केजरीवाल यांच्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर झाले. काही जण तुरुंगात गेले, पण येथेही ‘मोदींचे कारस्थान’ असे ते म्हणू लागले. केजरीवाल यांच्या हाती लोकांनी दिल्लीची किल्ली दिली. ती किल्ली खिशात ठेवून हे महाशय देश जिंकायला निघाले, पण प्रत्येक राज्यात ते पराभूत झाले. पंजाबात ‘आप’ची सत्ता येईल असे वातावरण आधी होते, पण तिथेही पक्षाने मातीच खाल्ली. भगवंत मान हे त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पराभूत झाले यातच सर्व आले. ‘केजरीवाल’ हा दोनेक वर्षांपूर्वी अभिमानाचा विषय होता. आज तो

थट्टेचा विषय

झाला. राजकारणात ते नवीन होते, पण तरीही त्यांना चांगले काम करता आले असते. थंड डोक्याने व संयमाने पावले टाकून विश्वास राखता आला असता. या काळात त्यांनी सहकारी गमावले व मित्र टिकवले नाहीत. अण्णा हजारे यांचा वापर करून ते राजकारणात शिरले, पण ते औटघटकेचे ठरले. केजरीवाल यांची सुरुवात रामलीला आणि जंतर मंतरवरून झाली, पण दिल्लीच्या निकालाने दाखवून दिले की, त्यांचे जंतर मंतर संपले आहे व लोकांनी त्यांचे ‘छु मंतर’ केले आहे. रामलीला मैदानावर बसायला आता त्यांच्यासाठी अण्णा हजारेही उपलब्ध नाहीत. केजरीवाल यांच्या शोकांतिकेस ते स्वतःच जबाबदार आहेत. राजकारण्यांना शिव्या घालणे व आरोप करणे सोपे असते. केजरीवाल आणि कंपनीने पक्षीय राजकारणात येण्यापूर्वी हेच उद्योग केले. आज केजरीवाल त्याच शिव्यांचे धनी झाले आहेत. मोदी लाटेचा पराभव करून दिल्ली विधानसभा जिंकणाऱया केजरीवाल यांचे जाहीर अभिनंदन आम्ही केले होते. आज त्यांच्या पराभवाची आम्हांस खंत नाही. कारण मिळालेली सत्ता सत्कारणी लावली नाही व सोन्यासारखी संधी गमावत त्यांनी व त्यांच्या ‘आप’ पक्षाने आत्महत्या केली. आता पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडून काय होणार? केजरीवालांसारखे लोक आत्मपरीक्षणही करू शकत नाहीत. आम्हांस आश्चर्य वाटतेय ते भारतीय जनता पक्षाचे. दिल्लीतील विजय या मंडळींनी सुकमातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या २५ शहिदांना अर्पण केलाय. भाजपच्या राजकीय विजयासाठी हे जवान शहीद झाले काय? शहिदांची संख्या रोजच वाढत आहे. म्हणून रोजच नव्या निवडणुका घ्याव्यात काय? जवानांचे बळी हा सर्वच राज्यकर्त्यांना कलंक आहे. पण राजकारण हा मूर्खांचा शेवटचा अड्डा ठरल्यावर दुसरे काय घडावे!

आपली प्रतिक्रिया द्या