आरे केंद्रचालकांच्या वारसांना हक्कापासून वंचित ठेवणे अन्यायकारक; महाराष्ट्र दूध वितरक सेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बृहन्मुंबई दूध योजना स्थापनेपासून कार्यरत असलेले आरे केंद्र संचालक आजही आरे स्टॉल चालवून आपली उपजीविका करीत आहेत. आतापर्यंत केंद्रचालकांच्या मृत्यूनंतर सदरचे केंद्र त्यांच्या वारसाच्या नावावर केले जात होते, मात्र प्रशासनाने आता नियमात बदल केल्याने केंद्रचालकाच्या मृत्यूनंतर ते वारसांकडे हस्तांतरण होत नाही. ही बाब अन्यायकारक असून त्याविरोधात महाराष्ट्र दूध वितरक सेनेने आंदोलनाचा इशारा  दिला आहे.

आरे स्टॉलधारकांनी वर्षानुवर्षे आपल्या स्टॉलची देखभाल-दुरुस्ती केली आहे. त्यामुळे केंद्रचालकांच्या योगदानाची जाणीव ठेवून ते चालकाच्या मृत्यूनंतर वारसाच्या नावावर व्हावेत म्हणून महाराष्ट्र दूध वितरक सेनेने पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रशासनाने  वारसांना त्यांची कायदेशीर पात्रता तपासून आरे स्टॉल देण्याचे निर्देश दिले होते. 2011पासून त्याची अंमलबजावणी होत आहे, मात्र 29 मार्च रोजीच्या पत्राद्वारे प्रशासनाने स्टॉल हस्तांतर धोरणात बदल करून केंद्र संचालक सक्षम नसल्यास किंवा मयत झाल्यास त्याच्या वारसाच्या नावे हस्तांतर करण्यात येणार नाही, असे नमूद आहे. त्यामुळे केंद्रचालकांच्या वारसांच्या हक्कावरही गदा येणार आहे. याचा महाराष्ट्र दूध वितरक सेनेने निषेध केला असून तीव्र आंदोलन केले जाईल असे संघटनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी स्पष्ट केले आहे.