लाल भडक नव्हे पिवळे जर्द कलिंगड; घोसाळ्याच्या शेतात ‘आरोही’चा बोलबाला, 45 रुपये किलो फळावर खवय्यांच्या उड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू झाल्याने लाल भडक आणि रसाळ कलिंगडांची मागणी वाढत असतानाच रोहे तालुक्यातील घोसाळे गावात दोन तरुण शेतकरी भावंडांनी पिवळ्या, पण गोड कलिंगडांची यशस्वी शेती केली आहे. ‘आरोही’ या वाणाच्या कलिंगडांनी त्यांचे शेतशिवार बहरून गेले आहे. थेट शेतात या आवडते फळ उचला आणि अवघ्या ४५ रुपयांत घरी घेऊन जा, अशी योजना त्यांनी राबवली असून त्यावर खवय्यांच्या उड्या पडत आहेत.

रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने अलिबाग, माणगाव, पेण आणि रोहे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड करतात. या लाल भडक आणि गोड कलिंगडांना जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पुण्यात मोठी मागणी असते, परंतु रोहे तालुक्यातील घोसाळे गावातील ऋषिकेश म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रे या शेतकरी भावंडांनी कलिंगडच्या लागवडीत वेगळे करण्याचा ध्यास घेतला आणि त्यांनी ‘आरोही’ या नवीन वाणाच्या बियाण्यांची निवड केली. या कलिंगडांचा गर लाल नव्हे तर पिवळा असतो आणि पेरलेल्या ‘आरोही’ने म्हात्रे बंधूंना मोठा हात दिला. त्यांचे शेतशिवार पिवळ्या गर्द कलिंगडांनी बहरून गेले आहे. म्हात्रे बंधूंनी सर्वसामान्य नागरिक शेताकडे वळावेत यासाठी शिवारात या, आवडीचे फळ निवडा, तुमच्या हाताने खुडा आणि घरी न्या ही अनोखी योजना त्यांनी सुरु केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आरोही’चे वैशिष्ट्य

पिवळ्या कलिंगडांची चव लाल कलिंगडांपेक्षा किंचित वेगळी आणि मधुर असते. याचा गर अधिक मऊ आणि रसाळ असतो. त्यात बीटा कॅरोटीनचे प्रमाण मुबलक असते, जे शरीरात व्हिटॅमिन ‘ए’ तयार करण्यात मदत करते. अॅण्टी ऑक्सिडंट्ससाठी हे कलिंगड उत्तम स्रोत आहे. हे वाण सामान्य बाजारात सहज उपलब्ध होत नाही आणि यात बियांचे प्रमाणही तुलनेत कमी असते. जवळपास सर्वच शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना विकतात, पण म्हात्रे बंधूंनी खवय्यांना आपल्या शेतातच आवतण दिले आहे.