आभाळमाया – अवकाशयात्री प्राणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक, [email protected]

पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जिथे संपतं आणि जवळ जवळ शून्य गुरुत्वाकर्षणाच्या अवकाशात गेल्यावर कोणत्याही जिवाचं किंवा वस्तूचं वजन शून्यावर येऊन ती तरंगायला लागते. या निर्वात पोकळीत वजन गणिती पद्धतीने अगदीच शून्यावर येत नाही, तर ते ‘मायक्रोग्रॅव्हिटी’ किंवा शून्यवत होतं. हे कसं घडतं ते गेली अनेक वर्षे आपण आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेलेल्या अवकाशयात्रींच्या तिथल्या वास्तव्याचं प्रत्यक्ष दर्शन घेताना पाहिलंय. असा निर्वात भाग अवकाशात असल्याची कल्पना आपल्याकडेही फार पूर्वी केली गेली होती. आधुनिक खगोलशास्त्र हा त्या संकल्पनांपलीकडचा प्रत्यक्ष प्रयोगांचा टप्पा ठरला. त्यामुळे अधिक सफाईदार गणिती मांडणी करून अवकाशयानांची निर्मिती झाली. भौतिकशास्त्राचा वापर सर्वांना सहज जाणवतील, समजतील असे प्रयोग करत अवकाशयान निर्मितीपर्यंतची प्रगती झाली.

पृथ्वीपलीकडच्या अवकाशात माणसाने जाण्यापूर्वी तिथे नुसतं एखादं यान पाठवणं उचित होतं. तोच प्रयोग रशियाने (त्या वेळचं यूएसएसआर) 1957 मध्ये केला. त्या वर्षीच्या 4 ऑक्टोबरला ‘स्पुटनिक-1’ हा जगातला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात भिरभिरला. तोपर्यंत आपल्याला पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेल्या चंद्राचीच माहिती होती. ‘स्पुटनिक-1’ चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अवकाशात माणूस पाठवण्याचा विचार जोर धरू लागला. मात्र एकदम माणसाला अवकाश प्रवास घडवण्यापूर्वी तिथल्या शून्यवत वातावरणाचा सजीवांवर काय परिणाम होतो ते पाहणं संशोधकांना योग्य वाटलं. नव्या वैद्यकीय संशोधनापासून अवकाश संशोधनापर्यंत अनेक क्षेत्रांत ज्याला इंग्रजीत ‘गिनी पिग’ म्हणतात असे सूक्ष्म ते मोठय़ा प्राण्यांवरचे प्रयोग आधी होत असतात त्याचे सजीवांवरचे परिणाम पाहून मग माणसांची निवड आटोकाट काळजी घेऊन केली जाते. त्या मूक जिवांना आपल्यावरच्या ‘प्रयोगा’ची कल्पना असण्याचं काहीच कारण नसतं. त्यामुळे त्यांच्या विषयी दयासुद्धा वाटते, पण प्रयोग अपरिहार्यही ठरतात. असं हे एक न सुटणारं कोडं ठरतं.

सुरुवातीला माणसाला काही लगेच चंद्रावर पाठवायचं नव्हतं. गुरुत्वाकर्षण जिथे शून्यवत होतं त्याच भागातून पृथ्वीची परिक्रमा करायची होती. त्याचे प्रयोग अगदी 1947 पासूनच सुरू झाले होते. 6 सप्टेंबर 1947 रोजी अमेरिकेने म्हणजे यूएस नौदलाने एका युद्धनौकेच्या डेकवरून व्ही-2 रॉकेट उडवलं, परंतु ते डळमळलं. त्यानंतर 20 फेब्रुवारी 1947 या दिवशी अमेरिकेचं असंच दुसरं रॉकेट अवकाशात 109 किलोमीटरपर्यंत गेलं. त्यामधून बऱयाच मधमाश्या अवकाशात पाठवल्या गेल्या. माणसाने अवकाशात धाडलेले ते पहिले सजीव. या मधमाश्यांवर अवकाशातील निर्वातपणाचा आणि विविध किरणांच्या प्रारणांचा काय परिणाम होतो ते तपासण्यासाठी हा प्रयोग केला गेला. या व्ही-2 रॉकेटच्या प्रयोगात वेर्नहर आणि ब्राऊन असे जर्मन तंत्रज्ञसुद्धा कार्यरत होते.

उंच आकाशात प्राणी पाठवण्याचे प्रयोग तर त्यापूर्वीच सुरू झाले होते. हॉटएअर बलून किंवा उष्णवायूच्या विशाल फुग्यांचा शोध लागल्यावर त्याला बांधलेल्या बास्केटमधून 1783 मध्येच मॉन्टगोल्फिअर बंधूंनी काही मेंढय़ा आणि बदकांना ‘बलून’चा प्रवास घडवला. हे प्राणी नंतर पृथ्वीवर सुखरूप परतले.

अमेरिकेने व्ही-2 रॉकेटद्वारे सजीव अवकाशात पाठवायचे ठरल्यावर मात्र मधमाश्या, उंदीर, घूस (हॅमस्टार), गियानातील डुकरे (गिनी पिग), बेडूक, बदके, मांजरे, कुत्रे इत्यादी प्राणी 110 कि.मी. उंच अवकाशात पाठवले. अल्बर्ट सेपंड हा पहिला वानर अवकाशात गेला तो 14 जून 1949 रोजी. माणसासारख्या प्राण्यावर अवकाशयात्रेचा काय परिणाम होतो ते पाहण्याचा प्रयोग यातून साधला गेला. हा वानर 134 किलोमीटर उंचीपर्यंत प्रवास करून आला.

31 ऑगस्ट 1950 या दिवशी एका उंदराला 137 किलोमीटर उंचीवरचा प्रवास घडवला. मात्र परतताना पॅरेशूट बिघडल्याने त्याचा अंत ओढवला. त्यानंतर अमेरिकेने अनेक उंदीर वेळोवेळी अवकाशात पाठवले. असे प्रयोग अमेरिका करतेय म्हटल्यावर रशिया स्पर्धेत उतरणारच. त्याने जिप्सी नावाच्या कुत्र्याची निवड अंतराळ प्रवासासाठी केली.

3 नोव्हेंबर 1957 ला प्राण्यांच्या अवकाशयात्रेत क्रांती झाली. रशियाच्या ‘स्पुटनिक’ अवकाशयानात बसून ‘लायका’ नावाची कुत्री पृथ्वी प्रदक्षिणेसाठी गेलेली पहिली प्राणी ठरली. मात्र या यात्रेत तिचा दुर्दैवी अंत ओढवला. नंतर अमेरिका, रशियाने अनेक प्राणी अवकाशात पाठवले आणि त्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये 1991 च्या जून महिन्यात पाठवलेल्या ‘जेली फिश’चाही समावेश होतो. मिशन एसटीएस-40 द्वारा 2478 ‘बेबी मून’ जेली फिश अंतराळात पाठवले गेले. हा कोलंबिया प्रकल्पाचा भाग होता. निर्वात पोकळीत या जेली फिशची प्रजनन क्षमता प्रचंड वाढून त्यांची संख्या 60 हजारांवर गेली. शून्यवत गुरुत्वाकर्षणातून पुन्हा गुरुत्वाकर्षण क्षेत्रात आल्यावर त्यांची स्पदनं वाढून त्यांना ‘भोवळं’ येऊ लागली. त्यांच्यात मोठय़ा प्रमाणावर पॅल्शियम क्रिस्टल तयार झाले. सजीव शून्यवत गुरुत्वाकर्षण पट्टय़ात सुखरूप राहू शकतात का? त्यांना तिथली वातावरण नसलेली अवस्था ‘पचवता’ येते का? त्यांच्यावर काही विपरीत परिणाम होतात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अशा प्रयोगांमधून मिळवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांचा अभ्यास करूनच रशियाने 12 एप्रिल 1961 रोजी युरी गागारिन नावाचा पहिला माणूस अंतराळात पाठवला. त्या यशानंतर अवकाशाची ‘दारे’ माणसासाठी उघडली!