
> अभय मिरजकर
शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्याचा योग्य उपयोग करून घेतला तर निश्चितपणे प्रगती साधता येते. अहमदपूर तालुक्यातील मौजे उमरगा (यल्लादेवी) येथील शुभांगी अंगद पांचाळ यांचा प्रवास पाहिला तर त्याची साक्ष पटते.
केवळ 12 वीपर्यत शिक्षण घेतलेल्या शुभांगी अंगद पांचाळ या बचत गटाशी जोडल्या गेल्या. संत ज्ञानेश्वरी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून त्यांनी प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाची साथ, योग्य मार्गदर्शन यामुळे त्यांनी उद्योगात भरारी घेतली. उमेद अभियानात सहभागी होत त्यांनी प्रशिक्षण घेतले. महिलांचा व्यवसाय म्हणजे शिलाई मशीन हे समीकरण ठरलेले. त्याचप्रमाणे शुभांगी पांचाळ यांनीही एक लाख रुपयांचे कर्ज घेऊन शिलाई मशीनच्या सहाय्याने व्यवसाय सुरू केला. त्यांचे पती अंगद पांचाळ हे पारंपरिक सुतारकाम करीत असत. त्या जोडीला शिलाई मशीन, पिठाची गिरणी, डाळ मिल असे उद्योग सुरू झाले.
बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीच्या स्टॉलमुळे त्यांना लाकडी खेळणी करण्याची कल्पना सुचली. लातूर येथे भरलेल्या हिरकणी हटमध्ये त्यांनी या वस्तूंची विक्री केली. हाच पारंपरिक व्यवसाय पुढे अधिक प्रमाणात करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. यासाठी काही अत्याधुनिक मशिन्स घेतल्या अन् संत ज्ञानेश्वरी लाकडी खेळणी व्यवसायाची सुरुवात झाली.
मागील वर्षी मुंबई येथे प्रदर्शनासाठी निवड झाली. मुंबईतील सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीते आत्मविश्वासाने आपले साहित्य विक्री केले. तिथे खूप साऱया गोष्टी शिकायला मिळाल्या. मनात आत्मविश्वास निर्माण झाला. अनेक नामवंत व्यक्ती, सिने कलाकार, उमेद अभियानातील अधिकारी वर्ग यांच्याशी ओळख झाली. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या प्रदर्शनामध्ये तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांचा व्यवसाय झाला. केवळ व्यवसाय झाला असे नाही, तर खूप काही शिकता आले. त्यांनी तयार केलेली बैलगाडी नागपूर विमानतळावर ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरी लाकडी खेळणीचे साहित्य उमेद मार्ट या ऑनलाइन पोर्टलवर, पण विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. राज्यातील महिलांसमोर त्यांनी एक यशस्वी महिला उद्योजक म्हणून आपला ठसा उमटवला आहे.

























































