भाजपचा असा पराभव होईल की पुन्हा तोंड दाखवायला जागा उरणार नाही; अभिषेक बॅनर्जी यांचा कडाडून हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने (TMC) पूर्व बर्धमान जिल्ह्यात आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. रविवारी झालेल्या एका जाहीर सभेत बोलताना पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. या निवडणुकीत भाजपचा असा निर्णायक पराभव होईल की, ते या जिल्ह्यात पुन्हा तोंड दाखवण्याची हिंमत करणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना बंगालविरोधी आणि बाहेरून आलेल्या जमीनदारांना राज्यातून कायमचे हाकलून लावण्याचे आवाहन केले. “पूर्व बर्धमान भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. मतांच्या शक्तीने त्यांना असा दणका द्या की ते पुन्हा इकडे फिरकणार नाहीत,” असे बॅनर्जी म्हणाले. त्यांनी जनतेला गणदेवता संबोधून ममता बॅनर्जी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, २०२१ च्या निवडणुकीत पूर्व बर्धमानने ममता बॅनर्जी यांना ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२६ च्या या निवडणुकीतही तसाच उत्साह पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व १६ विधानसभा मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा दावा पक्षाने केला आहे.