
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना रंगला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या लढतीत हैदराबादने कोलकाताचा 65 धावांनी केला आणि यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र, या विजयानंतर हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा वादाच्या भोऱ्यात अडकला आहे. आयपीएल 2026 च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.
कोलकाताविरुद्धच्या सामन्यादरम्यान अभिषेक शर्माने अश्लील शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. अर्थात हा प्रकार नेमका कधी घडला याबाबत माहिती मिळालेली नाही. सामना संपल्यानंतर बीसीसीआयने अभिषेक शर्मा याला आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.3 अंतर्गत दोषी ठरवले असून शिक्षा म्हणून त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला आहे. याशिवाय त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. अभिषेकने आपली चूक मान्य केली असून मॅच रेफरींचा निर्णय स्वीकारला आहे.
दरम्यान, या लढतीत अभिषेक शर्मा आपल्या जुन्या लयीत परतलेला पाहायला मिळाला. त्याने अवघ्या 21 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 4 षटकार आणि 4 चौकार ठोकले. त्याच्या या खेळीने हैदराबादच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण विजयानंतर त्याच्या गैरवर्तणुकीमुळे त्याला आर्थिक फटका सोसावा लागला.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 226 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात केकेआरचा संघ 16 षटकांत 161 धावांवर गारद झाला. हैदराबादसाठी नितीश कुमार रेड्डी, इशान मलिंगा आणि जयदेव उनाडकट यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. केकेआरकडून अंगकृष रघुवंशीने 52 आणि रिंकू सिंगने 35 धावा केल्या. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने कोलकाताला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.



























































