’आयुष्य सुंदर आहे..

>> निनाद पाटील 

आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त आनंद शोधता आला पाहिजे. प्रत्येक निराशेच्या पाठी एक नवी आशा, नवा कवडसा लपलेला असतो तो ओळखता आला पाहिजे… असा सुंदर संदेश देणारी गोष्ट असलेला एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे अनंत महादेवन दिग्दर्शित ‘लाईफ इज गुड.’ हल्लीच्या गल्लाभरू चित्रपटांच्या गर्दीत एक सुखद अनुभव देणारा चित्रपट तुम्हाला पाहायचा असेल तर ‘लाईफ इज गुड’ हा उत्तम पर्याय आहे.

ही गोष्ट आहे एका छोटय़ा शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये कारकून म्हणून काम करणाऱया रामेश्वर या पात्राची. आईच्या निधनानंतर आयुष्यात आलेला एकटेपणा त्याला बेचैन करत असतो, त्याचं कामातसुद्धा मन लागत नसतं आणि तो स्वतःपासूनसुद्धा दूर पळत असतो, अशाच एका अवस्थ वळणावर तो त्याचं आयुष्य संपविण्याचा विचार करत असताना, अचानक एका घटनेमुळे मिष्टी नावाची सहा वर्षांची मुलगी त्याच्या आयुष्यात येते आणि तिला पाहून त्याचा आत्महत्येचा विचार बदलतो आणि आईच्या जाण्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेला एकटेपणा हळूहळू दूर होऊ लागतो. मिष्टी आणि रामेश्वर यांच्या अनोख्या मैत्रीचे दिवस खूप आनंदी जाऊ लागतात. मिष्टी आपल्या मावशीसोबत राहत असते, तिलाही आई नसते आणि वडील काही वर्षे तिच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांना जेव्हा तिची गरज असते, तेव्हा ते पुन्हा तिला घेऊन जाणार असतात, पण मिष्टीला जायची इच्छा नसते, रामेश्वर आणि मिष्टीच्या मैत्रीचा 15 वर्षांचा प्रवास या गोष्टीत उलगडत जातो आणि अनेक छोटे-मोठे, सुख दुःखाचे प्रसंग येत-जात राहतात. तिच्या बालपणापासून लग्नापर्यंत रामेश्वर तिच्या सोबत असतो. सगळं आनंदी वाटत असताना नियती पुन्हा रामेश्वरच्या आयुष्यात एक नवीन वादळ घेऊन येते. ते वादळ कोणतं…? रामेश्वर आणि मिष्टीच्या मैत्रीचा प्रवास कुठवर असतो… अशा प्रकारची एक अनोखी मैत्री किती सुंदर असू शकते आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येकाच्या वाटय़ाला न चुकता येणारं मरण हे कसं स्वीकारता आलं पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा चित्रपट पाहून कळेल.सुजीत सेन यांची कथा असलेला आनंद शुक्ला निर्मित हा चित्रपट खऱया अर्थाने एक प्रवाहाबाहेरचा चित्रपट असून प्रवाहासोबत जगायला शिकवतो. या चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू अतिशय उत्तम आहेत. अल्फान्सो रॉय यांचे छायाचित्रण, अभिषेक रे यांचे सुमधुर संगीत, अनंत महादेवन यांचे अतिशय सुरेख दिग्दर्शन, जॅकी श्रॉफ यांच्या इमेज ब्रेक करणारी भूमिका, बालकलाकार सानिया अंकलेसरिया, अनन्या वीज आणि सोबतीला मोहन कपूर, अंकिता श्रीवास्तव, रजित कपूर, दर्शन जरीवाला, सुनीता सेन यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घेऊन पाहावा.