वाल्मीकअण्णांची बदनामी महागात पडेल, फरार गोट्या गित्तेची आव्हाडांना धमकी

महायुती सरकारच्या काळात फरार गुन्हेगारांचीही मजल इतकी वाढली आहे की, पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या कारवाया सुरू आहेत. बीड जिह्यातील मोक्कातील फरार आरोपी ज्ञानोबा ऊर्फ गोट्या मारुती गित्ते याने व्हिडीओद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे.

गोट्या गित्ते याच्याविरोधात एका खून प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फरार गित्तेला पकडण्यासाठी पोलीस जंग पछाडत आहेत. आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे जितेंद्र आव्हाड यांना, वाल्मीक कराड यांची बदनामी करणे महागात पडेल अशी धमकी गित्ते याने त्यात दिली आहे.

मला फाशी होईल अथवा नाही, पण वाल्मीकअण्णा कराड माझे दैवत आहेत. त्यांना टार्गेट करू नका. परळीत येऊन गरीब-श्रीमंत कोणालाही विचारा की, अण्णा कोण आहेत ते. सगळेजण त्यांना दैवत म्हणतील. मी आत्महत्या केली तर त्याचे जबाबदार तुम्ही असाल. जय हिंद जय महाराष्ट्र, असे गित्ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. दरम्यान, अशा धमक्यांना घाबरणारा मी नाही, मी खानदानी वंजारी आहे. खून करून, बंदूक दाखवून जमिनी खाणारा वंजारी नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.