मिंधे सरकारच्या शिवद्रोहाविरुद्ध महाराष्ट्रात संताप
झुंडशाही मोडून काढत आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा
भाजपकडून शिवरायांच्या अवमानाचे समर्थन
जनआक्रोश आंदोलनाला आडवे गेले
छत्रपती शिवराय पुतळा दुर्घटनेचे तीव्र पडसाद
स्थानिकांचा उत्स्फूर्त बंद, मालवण बाजारपेठेत शुकशुकाट
शिल्पकार आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील फरार
मिंधे सरकारच्या शिवद्रोहाविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. मालवणच्या राजकोटवरील शिवपुतळा दुर्घटनेचा जागोजागी निषेध होतोय. महाविकास आघाडीनेही भ्रष्ट मिंधे सरकारविरुद्ध आज मालवणात प्रचंड मोर्चा काढला. हजारो शिवप्रेमी त्यात सहभागी झाले होते. शिवप्रेमी राजकोटच्या दिशेने जाऊ नयेत म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निलेश राणे यांनी रस्ते अडवले. त्यानंतरही शिवप्रेमींनी राजकोटवर धडक दिल्यानंतर तर राणे पितापुत्रांचा थयथयाट झाला. त्यांनी अक्षरशः महाराष्ट्राला लाज आणली. दोघांनीही शिवप्रेमींना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यांची गुंडगिरी माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि ती प्रसारीत होताच पुन्हा शिवकालीन यवनांची आठवण झाली, अशी प्रतिक्रिया उभ्या महाराष्ट्रात उमटली.
सिंधुदुर्गातील मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवणात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी राजकोटवरील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आले होते. पाहणीनंतर ते मोर्चात सहभागी होणार होते. दरम्यान, मालवणच्या भरड नाक्यावरून महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली. मात्र आदित्य ठाकरे राजकोटवर येताच तिथे आधीच ठाण मांडून असलेले नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, शिवसैनिक आणि शिवप्रेमींना जाणीवपूर्वक डिवचले. यावेळी दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करताच निलेश राणे पोलिसांवरच डाफरले. त्यांनी कार्यकर्त्यांना शिवसैनिक आणि शिवप्रेमींवर तुटून पडण्यास सांगितले. त्यामुळे राणेंचे कार्यकर्ते शिवीगाळ करत शिवप्रेमींच्या अंगावर धावून गेले. यावेळी राणे समर्थकांनी राजकोटावरील चिऱ्यांचीही नासधूस केली.
राजकोटवर आलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि शिवप्रेमींना बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी राणे समर्थकांनी यावेळी दिली. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय, त्यांना वाटतं आम्ही काहीतरी कोंबडी वगैरे सोबत आणल्या आहेत, पण आम्ही चोर वाटेने जाणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी बजावून सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार रोखून धरल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावरच ठिय्या मांडला. यावेळी शिवरायांच्या जयजयकाराने राजकोट दुमदुमला. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची अतिरिक्त कुमक राजकोटवर पाठवण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार खुले करा असे सांगूनही पोलीस ऐकत नसल्याने आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा आम्हाला जर पंधरा मिनिटात रस्ता खुला करून दिला गेला नाही, तर आम्ही सुद्धा घुसू असा इशारा दिला. विनायक राऊत यांनीही पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यामुळे दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. वातावरण तणावग्रस्त झाल्याने जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवालसुद्धा आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले.
वातावरण चिघळल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जयंत पाटील यांनी बाहेर येऊन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर नारायण राणे, निलेश राणे यांच्याशी त्यांनी चर्चा केली व मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गटाकडून घोषणाबाजी सुरुच होती. यावेळी पोलिसांसोबत एका शिवप्रेमी महिलेची शाब्दिक बाचाबाची झाली. दगडफेकही झाली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मागच्या दाराने बाहेर काढा अशी मागणी राणे पितापुत्रांकडून करण्यात आली. मात्र दहशतीला भीक घालत नाही असे ठणकावत आदित्य ठाकरे यांनी मुख्य प्रवेशद्वारातूनच बाहेर जाऊ अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढली. भाजपाच्या नाकावर टिच्चून आदित्य ठाकरे मुख्य प्रवेशद्वारातूनच सर्व कार्यकर्त्यांना घेऊन सुरक्षित बाहेर पडले. यावेळी शिवसैनिक व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा दिल्या. त्या घोषणांमध्ये आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. यावेळी जय भवानी.. जय शिवाजी..च्या घोषणा देत आदित्य ठाकरे बाहेर आले.
राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे नतमस्तक
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर तो पूर्ण भाग झाकून ठेवण्यात आला आहे. आज राजकोट येथे दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे सर्वप्रथम दुर्घटनास्थळी पोहचले. तिथे चौथऱ्यावर जाऊन ते नतमस्तक झाले. हात जोडून त्यांनी वंदन केले. यावेळी शिवसैनिकांनी शिवरायांचा जयघोष केला.
उद्धव ठाकरे यांचा फोन
राजकोटवर राणेंच्या गुंडांची हुल्लडबाजी सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदित्य ठाकरे यांना फोन आला. फोनवर नेमके काय बोलणे झाले अशी विचारणा माध्यमांनी केली असता, त्यांनी मला पुतळ्याबद्दल विचारले. नक्की काय झाले याची विचारणा त्यांनी केली. तिथे किती भ्रष्टाचार झाला ते पाहून ये. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल, असे ते म्हणाले. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही, अशी हिंमत देण्यासाठी त्यांनी फोन केला होता, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
वाघ नडला आणि भिडला!
महाविकास आघाडीच्या मोर्चात राणेंच्या गुंडांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला बहाद्दर शिवसैनिक पुरून उरले. राजकोटवर आडवे येण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या दलालांना आदित्य ठाकरे यांनी हिसका दाखवला. राणे पिता-पुत्राला आदित्य ठाकरे थेट नडले. यावेळी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा घुमल्या. सोशल मीडियातही याचीच चर्चा होती. मालवणमध्ये भेकडांना वाघ भिडला, अशी पोस्ट शिवसेनेने एक्सवर केली. ती पोस्टही प्रचंड व्हायरल झाली.
रणरागिणींनी दाखवला हिसका
शिल्पा खोत, तृप्ती मयेकर यांच्यासह शिवसेनेच्या रणरागिणींनी राणे पितापुत्रांना हिसका दाखवला. भगवा झेंडा हाती घेत गेटवरील पोलिसांचा अडथळा ओलांडत या दोघी आतमध्ये शिरल्या. राणेंच्या गुंडांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला त्या मागे हटल्या नाहीत. थेट राणेंसमोर जात त्या भिडल्या. शिवरायांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आमची चळवळ सुरू असताना तुमची येथे वळवळ कशासाठी, असे शिल्पा खोत यांनी सुनावले.
नीलेश राणे पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावले
नीलेश राणे पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले. ‘तू माझं काय करणार सांग… माझ्या अंगाला हात लावायचा नाही,’ असे धमकावत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र नीलेश यांची अरेरावी सुरूच होती. जयंत पाटील पुढे आले. त्यांनी नीलेश यांना रोखले, पण ते ऐकले नाहीत. त्यानंतर राणे यांच्या भाडोत्री गुंडांनी हुल्लडबाजी केली.
ए कोंबडीचोरा…
महाविकास आघाडीच्या मोर्चात आडवे येणाऱ्या राणे पितापुत्र आणि त्यांच्या हुल्लडबाज कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी दणका दिला. राणेंच्या तोंडावरच शिवसैनिकांनी ‘ए कोंबडीचोरा’ म्हणत प्रतिकार केला. त्यानंतर तणाव आणखीच वाढला.
राणेंचा मुंबई प्रेस क्लब आणि मंत्रालय वार्ताहर संघाकडून निषेध
एबीपी माझाचा बूम खेचून पत्रकार अमोल मोरे यांना नारायण राणे यांनी धमकावले. त्याचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध करण्यात आला आहे. राणे हे खासदार आहेत. त्यांचे वर्तन अयोग्य असून सत्तेचा हा दुरुपयोग आहे. याची गंभीर दखल घेऊन राणेंवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रेस क्लबने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघानेही राणेंनी दिलेल्या धमकीचा तीव्र निषेध करत माफी मागण्याची मागणी केली आहे.
घरातून खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकीन – भाजपचे खासदार नारायण राणेंची धमकी
राजकोट किल्ल्यावर गेलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी हुज्जत घातली. यावेळी पोलिसांनी राणे यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, ‘पोलिसांना त्यांना (महाविकास आघाडीला) सहकार्य करायचं असेल तर करा, पण यापुढे आमच्या जिह्यात तुम्हाला असहकार्य असेल. तुम्ही त्यांना येऊ दिलात. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या. मी बघतो, घरात घुसून एकेकाला रात्रभर मारून टाकीन. सोडणार नाही, अशी धमकीच नारायण राणेंनी यांनी पोलिसांसमोर दिली. यावेळी या ठिकाणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या अंगावर ते धावून गेले, एबीपी वृत्तवाहिनीचा बूम खेचत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाही राणेंनी धमकावले.
फडणवीसांकडून राणेंचे समर्थन
नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे. ते आक्रमकपणे बोलतात, पण त्यांना कुणाला धमकी द्यायची असेल असे वाटत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचे समर्थन केले.