
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईकरांसाठीची दुसरी नवीकोरी एसी लोकल अखेर चेन्नईतून विरार कारशेडमध्ये दाखल झाली. या लोकलच्या चाचण्या पश्चिम रेल्वेमार्गावर न करता मध्य रेल्वेवर करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरही येत्या काळात एसी लोकल चालविण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या घाट सेक्शनवर (कर्जत-कसारा) एसी लोकल धावताना नेमक्या काय अडचणी येतात याचा अभ्यास करण्यासाठी नव्या एसी लोकलच्या चाचण्या मध्य रेल्वेवरही घेण्यात येणार आहेत.
मुंबईकरांसाठीची दुसरी एसी लोकल चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यातून विरारमध्ये पोहचली परंतु सध्या तिच्या चाचण्या पश्चिम रेल्वेवर न करता मध्य रेल्वेवर करण्यात येणार आहेत. पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेला मिळाली आहे. आता दुसरी एसी लोकलही पश्चिम रेल्वेलाच मिळणार आहे. आगामी एसी लोकल मध्य रेल्वेला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गाचा अंदाज येण्यासाठी मध्य रेल्वेवर नव्या एसी लोकलच्या चाचण्या करण्यात येणार आहेत.
घाट सेक्शनवर चाचण्या
घाटावर गाडी धावताना काही अडचणी येतात का याचा अभ्यास करण्यात येऊन त्यानुसार नव्या एसी गाडीत बदल करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर तिच्या चाचण्या झाल्यानंतर ती मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीस पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येणार आहे. या नव्या एसी गाडीत प्रवाशांसाठी दहा टक्के (350 प्रवासी) जादा जागा असेल.


























































