मेहकरच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधकच्या ताब्यात

27

सामना प्रतिनिधी । मेहकर (बुलढाणा)

मेहकर येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा रमेशराव माजरखेडे यांना आज पाच हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

मेहकर तालुक्यातील एका धान्य दुकानदाराचा तपासणी अहवाल वरिष्ठांकडे चांगला पाठविण्यासाठी पुरवठा निरिक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे यांनी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार सदर धान्य दुकानदाराने लाच लुचपत विभाग, बुलढाणा यांचेकडे केली. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. मात्र पुरवठा अधिकारी मनिषा माजरखेडे यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम घेतली नाही. तरी सुद्धा लोकसेवक तथा पुरवठा निरिक्षण अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून न शोभणारे काम केल्याने त्यांचे विरुद्ध कलम ७ लाच लुचपत प्रतिबंधक कायदा संशोधन २०१८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधिक्षक शैलेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना जाधव, कर्मचारी विलास साखरे, निलेश सोळंके, विनोद लोखंडे, मधुकर रगड यांनी पार पाडली. या घटनेमुळे मेहकर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तर पुरवठा निरिक्षण अधिकारी मनिषा माजरखेडे यांच्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी धान्य दुकानदारांनी आमदार संजय रायमुलकर यांची भेट घेतली होती.

आपली प्रतिक्रिया द्या